छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज लोकसभा निवडणूक 2024 मध्ये नशीब आजमावत आहेत. छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून तर उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभा मतदार संघातून उभे ठाकले आहेत. दोघांनी वेगवेगळ्या पक्षाच्या तिकीटावर उमेदवारी जाहीर केली आहे. या दोघांकडे लक्ष्मी पाणी भरते. ते किती संपत्तीचे धनी आहेत, अशी उत्सुकता सर्वांनाच आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे इतकी संपत्ती आहे.
छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे किती संपत्ती?
छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसच्या तिकीटावर कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून या रणधुमाळीत उतरले आहेत. HT नुसार, छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे जवळपास 343 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर त्यांची पत्नी याज्ञसेनीराजे यांच्या नावावर स्थावर आणि जंगम मालमत्ता आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला दाखल केलेल्या शपथपत्रानुसार, त्यांच्याकडे 150 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. त्यातील मोठा भाग हा त्यांना वारसाहक्काने मिळालेला आहे.
उदयनराजे भोसले यांची संपत्ती किती?शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाजापैकी एक आहे. त्यांचे दुसरे वंशज उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभा मतदार संघातून नशीब आजमावत आहेत. ते भाजपचे उमेदवार आहेत. उदयनराजे भोसले यांनी 226 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. त्यांच्या डोईवर 2.44 कोटी रुपयांचे कर्ज आहे. यामध्ये 31.64 लाख रुपयांचे वाहन कर्जाचा पण समावेश आहे.
कोल्हापूरमध्ये शिंदे शिवसेनेशी सामना
शाहू महाराज यांच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने संजय मंडलिक यांना उभे केले आहे. शाहू महाराज यांच्याकडे शहरात 65,614 चौरस फुटावरील राजमहल आहे. त्यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही. त्यांच्याकडे 75 लाख रुपयांची जीवन विमा पॉलिसी आहे.
शशिकांत शिंदे देणार लढत
उदयनराजे भोसले हे सध्या भाजपकडून राज्यसभेतील खासदार आहेत. त्यांच्याविरोधात शशिकांत शिंदे , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(शरदचंद्र पवार) यांनी शड्ड ठोकले आहे. उदयनराजे यांना 148.72 कोटी रुपयांची संपत्ती वारसाहक्काने मिळाली आहे. त्यांनी निवडणूक शपथपत्रात 172.49 कोटी रुपयांची एकूण स्थावर मालमत्ता जाहीर केलेली आहे. त्यांच्याकडे सातारा, सोलापूर, पुणे आणि इतर ठिकाणी व्यावसायीक संपत्ती, कृषी भूखंड आणि इतर संपत्ती आहे. त्यांच्या पत्नीच्या नावे गोव्यात संपत्ती तर एक वोक्सवॅगन पोलो कारचा यामध्ये समावेश आहे.