लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत दोन दिवसांपूर्वी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा बॉम्ब टाकला. 2008 साली मुंबईत दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्यावर दहशतवादी अजमल कसाब याने गोळ्या झाडल्या नाहीत. तर आरएसएस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने गोळीबार केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आरोपांचे एकच काहूर उठले. भाजपने या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला. दोन दिवसांपासून या वक्तव्यावर रान पेटले आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वक्तव्यावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले फडणवीस
विजय वडेट्टीवार यांची चौकशी झाली पाहिजे. ते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. ते कुणाला भेटून आलेत याची चौकशी व्हावी. आम्ही उज्ज्वल निकम सोबत तर ते अजमल कसब सोबत आहेत, असा घणाघाती प्रहार फडणवीस यांनी वडेट्टीवार यांच्यावर केला. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे मोर्चा वळवला. वडेट्टीवार जे बोलले त्याच्याशी ठाकरे सहमत आहेत का, असा खोचक सवाल त्यांनी विचारला. मतांच्या लांगूलचालनसाठी ते गप्पा आहेत का ? मतांसाठी उद्धव ठाकरे लाचार आहेत, असा प्रहार त्यांनी केला. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात हा मुद्दा पेटल्याचे दिसत आहे.
काय म्हणाले होते वडेट्टीवार
आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी कसाबच्या अथवा कुठल्याही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती. ती गोळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्य पिस्तुलमधील होती. त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे. अशा देशद्रोह्याला भारतीय जनता पक्ष उमेदवारी देत असले तर भाजप देशद्रोह्यांना पाठिशी घालत आहे, असे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले होते.
भाजपची निवडणूक आयोगात धाव
करकरे यांच्या प्रकरणात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने यापूर्वी वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. आता भाजपने मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली आहे. वडेट्टीवार यांच्या आरोपात काहीच तथ्य नाही. त्यांनी आचार संहितेचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.