राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. “मोदीजी माझ्याशी लढा. माझ्या आई-वडिलांचा अपमान सहन करणार नाही. तुम्ही कुठे पण राहा. तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणाले होतात तुम्ही, बाळासाहेबांच्या नकली मुलाला मी विचारात आहे. नकली?” हा माझा अपमान नाही, तर देवतासमान माझी आई आणि माझे वडील बाळासाहेब यांचा अपमान आहे. मोदी तुम्ही संस्कारी नसाल तर पण मी सुसंस्कृत घरातून आलो आहे. मला त्याचा अभिमान आहे, असा पलटवार उद्धव ठाकरे यांनी शिर्डी येथील कार्यक्रमात मोदींवर केला.
बाळासाहेब नाही, हिंदू हृदयसम्राट म्हणा
मातृदेव भव: पितृ देव भव:.. असं म्हणणारे आमचे हिंदूत्व आहे. तुम्ही केवळ बाळासाहेब म्हणत आहात. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब असे म्हणा. जर तुम्ही हे म्हणू शकत नसाल तर हा महाराष्ट्र तुम्हाला दाखवून देईल की हिंदू हृदयसम्राट कसे म्हणतात, असा टोला त्यांनी मोदींना लगावला. 2014 मध्ये मोदी मोझी स्वाक्षरी घेऊन प्रणव मुखर्जी यांच्याकडे गेल्याची आठवण त्यांनी करुन दिली आणि आज तेच मोदी मला नकली मुलगा म्हणत आहे. 2014 आणि 2019 मध्ये माझी स्वाक्षरी घेताना लाज नाही वाटली का अशी जहरी टीका त्यांनी मोदींवर केली.
तुम्हीच नकली
आता 17 मे रोजी हे लोक मुंबईतील शिवाजी पार्कवर येतील. बाळासाहेबांच्या स्मारकावर पोहचतील. तिथे नाक रगडतील. मंचावर बाळासाहेबांच्या आठवणीत रडतील. हे नकली, बनावट लोक आहेत. मला जर तुम्ही नकली मुलगा म्हणता तर तुम्ही पण नकली आहात.
आमचा केला वापर
यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. तुम्ही या शिवसेनेला नकली म्हणता. बाळासाहेब यांच्या मुलाला नकील म्हणताय. त्यांनी जनतेला यावेळी विचारले की, हे तुम्हाला मान्य आहे का? 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीपर्यंत आम्ही तुमच्यासोबत होतो. त्याच वर्षी विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांचा मला फोन आला. वरिष्ठांनी युती तुटल्याचा निरोप त्यांनी दिला. आमचा वापर भाजपने केला असा घणाघात त्यांनी केला.