अक्षय मंकनी, प्रतिनिधी, मुंबई | 7 March 2024 : तर लोकसभा निवडणुकीचा बिगूल केव्हा पण वाजू शकतो. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाआघाडी असा आमना-सामना पाहायला मिळेल. पण त्यापूर्वी जागा वाटापावरुन खल सुरु आहे. जागा वाटपात काही जागांवर अनेक घटक पक्ष आग्रही आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी बैठकांचे सत्र सुरु आहे. पण अजून पूर्ण तोडगा निघाले नसल्याचे समोर येत आहे. उत्तर पश्चिम मुंबईबाबत पण असाच काहीसा प्रकार पाहायला मिळत आहे. अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. तर काँग्रेसने या मतदार संघात आता नवीन चेहरा देण्याचे ठरवल्याची चर्चा सुरु आहे. यापूर्वी बॉलिवूड अभिनेता गोविंदाने या मतदारसंघातून नशीब आजमावले होते. आता काँग्रेसने या दमदार अभिनेत्याचा चेहरा पुढे केला आहे.
आता बदलली सर्वच समीकरणं
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात आतापर्यंत शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगत आला आहे. आता मात्र समीकरणं बदलली आहे. उद्धव ठाकरे गटाने या जागेवर दावा सांगितला आहे. तर हा मतदार संघ हा भाजपच्या पारड्यात पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीत शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तीकर हे निवडून आले होते. त्यांनी नंतर ठाकरेविरोधातील बंडात एकनाथ शिंदे यांचा पक्ष धरला. पण ताज्या समीकरणानुसार, हा मतदार संघ शिंदे गटाऐवजी भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
संजय निरुपम यांचा दावा
उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघात गोविंदाने पण नशीब आजमावले आणि तो विजय पण झाला होता. काँग्रेसकडून अगोदरच संजय निरुपम यांनी या मतदार संघासाठी शड्डू ठोकले आहेत. पण आता काँग्रेस श्रेष्ठींनी दुसरेच नाव पुढे केल्याने निरुपम काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निरुपम यांना दुखवत काँग्रेस पुढे जाणार का असा प्रश्न आहे.
राज बब्बर यांचे नाव केले पुढे
काँग्रेसकडून उत्तर पश्चिम मुंबईतून राज बब्बर यांचे नाव चर्चेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्लीच्या उच्चपदस्थांकडून राज बब्बरचं नाव पुढे करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. राज बब्बर देखील ह्याच मतदारसंघात वर्सोवा येथे राहत असल्याने आणि सेलिब्रिटी चेहरा असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या ठिकाणी विद्यमान खासदार हे गजानन कीर्तीकर हे आहेत पण या जागेवर अगोदरच काँग्रेस चे नेते संजय निरुपम यांनी दावा केला होता. आता कोणात सामना होणार हे लवकरच समोर येईल.