मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Raj Thackeray MNS News) मशिदींवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर आता मुस्लिम धर्मगुरुंनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईतील 26 मशिदींच्या धर्मगुरुंची बैठक पार पडली. बुधवारी रात्री उशिरा पर्यंत चाललेल्या या बैठकीनंतर आता मुंबईतील मशिदींत सकाळी पार पडणारी अजान ही लाऊडस्पीकरविना (Loudspeaker Row) करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करण्याच्या अनुशंगानं हा निर्णय घेतला गेला. भायखळ्यातील मदनपुरा, नागपाडा आणि आग्रीपाडा भागातील मुस्लिम धर्मगुरुंमध्ये (Muslim Religious leader) पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय झालाय. दुसरीक मुंबईतील झोन 11चे डीसीपी विशाल ठाकूर यांनी मुंबईतील मालाड मालवणी येथील मशिदींमधून अजान देण्याबाबत मशिदींचे ट्रस्टी आणि मौलानांसोबत बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये मालाड, मालवणीतील जवळपास सर्व मशिदींच्या विश्वस्तांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणार असल्याचे पोलिसांना सांगितले. सभेला उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने हात वर करून मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबाबत बोलले असता उपस्थित सर्वांनी हात वर करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मुंबई पाठोपाठ राज्याच्या वेगवेगळ्या भागातील मुस्लिम धर्मगुरुंनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करत सकाळची अजान ही भोंग्याविनाच करण्याचा निर्णय घेतलाय.
रत्नागिरी शहरातील मुस्लिम बांधवांनीही सामाजिक सलोख्याचा निर्णय घेतलाय. शहरातील तीसहून अधिक मशिदींवर पहाटेची अजाण भोंग्यावर होणार नाही, असं जाहीर केलंय. रत्नागिरीत आजपासून याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. तर पहाटेनंतरच्या अजाण सुद्धा कमी आवाजाच्या डेसीबलमध्ये केली जाईल, असंही सांगण्यात आलंय. शहरातील जमातुल मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष शकिल मुर्तझा यांनी ही माहिती दिली आहे.
मनसेनं मशिदींवरील भोंगे खाली उतरवले गेले नाही, तर त्यांना हनुमान चालिसेनं उत्तर देऊ असा इशारा दिला होता. त्यानंतर राज्यातील बहुतांश मशिदींवरील भोंग्यावरुन दिली जाणारी अजान ही बंद करण्यात आली आहे. तर बहुतांश ठिकाणी नियमांचं पालन करत अजान देण्यात आली आहे. अशातच आता मुंबईतील मशिदींमध्ये पहाटेची अजान ही भोंग्याविनाच करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आलाय. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आदेशाप्रमाणे रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत भोंगे न लावण्यावर मुस्लिम धर्मगुरुंनी एकमत नोंदवलंय. त्यानुसार हा निर्णय जाहीर करण्यात आलं.
दरम्यान, राज ठाकरे यांनी मशिदींनी अजान भोंग्यावरुन न देण्याच्या निर्णयाचं बुधवारी बोलतानाचा कौतुक केलं होतं. मुस्लिम धर्मगुरुंनी मनसेनं उपस्थित केलेला विषय हा धार्मिक नसून सामाजिक असल्याचं समजलं आहे, असं म्हणत त्यांनी मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या भूमिकेचं स्वागत केलं होतं. मात्र जर भविष्यात पुन्हा भोंगे लागले, तर त्याला हनुमान चालिसेनं उत्तर दिलं जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता.