कुणाल जायकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी काल महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. यावेळी महाविकास आघाडीची लाईन ऑफ अॅक्शन ठरली आहे. तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे लढायचं. सोबत मित्र पक्षांना घ्यायचं. तीन पक्षाच्या प्रत्येकी दोन दोन सदस्यांनी मिळून लोकसभेच्या जागा वाटप करायच्या आणि विधानसभेच्या जागा वाटपावर चर्चा करायची असं या बैठकीत ठरल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिली आहे. ते मीडियाशी बोलत होते.
2104 पासून कर्नाटकाच्या निकालापर्यंत काही राज्यांचा अपवाद वगळता देशात भाजपचे सरकार येत होते. त्यामुळे भाजपमध्ये उत्साह असाचा. जोश असायचा. या निकालांमुळे विरोधक निराश झाले होते. पण कर्नाटकातील निकाल आला. काँग्रेसला मोठा विजय मिळाला. इतका की एक्झिट पोलचे अंदाजही चुकले. त्यामुळे सर्वांचा उत्साह वाढला. त्यामुळे पुढची लाईन ऑफ अॅक्शन महाविकास आघाडीची काय असावी? वज्रमूठ सभा काय कुठे कुठे घ्यावी यावर कालच्या बैठकीत चर्चा करण्यात आली, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
मागच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची युती होती. यावेळी महाविकास आघाडी आहे. या तिघांनी लोकसभेच्या 48 जागांचं वाटप करावं, कोणी कोणत्या जागा लढवायच्या ते ठरवावं. विधानसभेच्या 288 जागांचीही चर्चा करावी. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता काहींनी वर्तवली. त्यामुळे त्यावरही चर्चा झाली, असंही त्यांनी सांगितलं.
जागा वाटपासाठी प्रत्येक पक्षाकडून नावे येणार आहेत. पण जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी एका पक्षाचे साधारण दोन सदस्य असावेत असं ठरलं. म्हणजे एकूण सहा नेते एकत्र बसून लोकसभेच्या 48 आणि विधानसभेच्या 288 जागांची चर्चा करतील असं ठरलं. तीन पक्ष नाही तर त्यांच्याशी संबंधित जे मित्र पक्ष आहेत, त्यांची आमदार संख्या कमी असेल, पण त्यांना मानणारा वर्ग आहे. मतदार आहे. त्या पक्षांनाही सोबत घेण्याचा निर्णय घेतला, असं त्यांनी सांगितलं.
288 पैकी 16 आमदारांचा वेगळा निकाल लागला. पण निकाल वेगळा लागणारच नाही. पण लागला तरी बहुमतावर परिणाम होणार नाही. त्यांचे सरकार कायम राहील, असं सांगतानाच कोर्टाने व्यवस्थित निकाल दिला आहे. विधानसभा अध्यक्ष 16 जणांचा निर्णय घेईल. यापूर्वीही विधानसभा अध्यक्षांनीच निर्णय घेतलेला आहे, असंही ते म्हणाले.