विधानसभा निवडणूक 2024 चे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. विविध मुद्दे, आरोप-प्रत्यारोप, गौप्यस्फोटाने राजकारण तापलं आहे. यंदाच्या विधानसभेसाठी पक्षांची संख्या जास्त आहे. तर मुख्यमंत्री पदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी इच्छुकांची भाऊ गर्दी पण कमी नाही. विद्यामान मुख्यमंत्रीच नाही तर राज्यातील अनेक दिग्गजांचा या खुर्चीवर डोळा आहे. विधानसभेच्या निकालानंतर सत्ता समीकरण कुणाकडे झुकते. जनता कुणाला कौल देते आणि राजकीय गोळाबेरजेनंतर कोण मुख्यमंत्री होतो हे काळाच्या उदरातून बाहेर येईलच. पण तोपर्यंत कार्यकर्ते आणि नेते हौस पुरवून घेत आहे, हे ही नसे थोडके…
दोन वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. अगोदर शिवसेनेला सुरूंग लावण्यात भाजपला यश आले. त्यानंतर राष्ट्रवादीचा अभेद्य किल्ला फोडण्यात यश आले. या फोडाफोडीतून राज्यात महायुतीच्या हातात सत्तेची चाबी आली. आतापर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना-भाजप अशा दोन खेम्यात अडकलेल्या राजकारणात खिचडी सरकार कधी आले हे जनतेला पण कळाले नाही.
अजित पवार हेच मुख्यमंत्री
दादा गटाने राष्ट्रवादीचा मोठा खेमा महायुतीत आणला. नैसर्गिक आघाडी व्यतिरिक्त हा वेगळाच प्रयोग भाजपने राज्यात राबवला. अर्थात यामुळे भाजपला शिंदे गटावर आणि दादा गटावर दबाव तंत्राचा वापर करणे सोपे झाल्याचा राजकीय तज्ज्ञांचा होरा आहे. पण रोखठोक दादांना अंदाज पंचेवर विश्वास नाही. त्यांच्या गोटातील अनेक नेत्यांनी अजित पवारांना कधीचेच मुख्यमंत्री पदी विराजमान केले आहे. लाडकी बहीण योजनेत हा करिष्मा अनेकदा पाहायला मिळाला आहे.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री पदी?
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला मोठे भगदाड पाडले. त्यांनी नैसर्गिक युतीचा हाकारा दिला आणि भाजपसोबत सत्ता मिळवली. त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली. एकनाथ शिंदे यांनी नवखे असताना ही लिलया ही जबाबदारी पार पडल्याने राजकीय पंडीतही चकित झाले. संख्याबळानुसार आणि लोकसभेतील कामगिरीनुसार एकनाथ शिंदे यांचा या खुर्चीवरचा दावा कोण नाकारू शकेल? शिंदे गटातील अनेक नेत्यांची विधानं त्यांना दुजोराच देतात.
मी पुन्हा येईन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भीमगर्जना कोण विसरेल? मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा पुन्हा येईन हे त्यांनी जाहीर केलेले आहे. त्यांनी राज्याच्या राजकारणात मोठा चमत्कार करुन दाखवला आहे. मुख्यमंत्री पदाची संधी आपणहून सोडल्याचा त्यांचा दावा असला तरी भाजपच्या गोटातून संकटमोचक तेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे सांगायला मात्र विसरत नाहीत, यातच सगळं आलं आहे.
उद्धव ठाकरे यांना पुन्हा संधी?
महाविकास आघाडीचा चमत्कार पण राज्याने पाहिला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत एकत्र बसेल, हे कुणी स्वप्नात पण हेरले नव्हते. पण हा चमत्कार घडला. कोणी घडवला, का घडला हा इतिहास आता जगाला माहिती आहे. पण उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जनतेसमोर यावा, असे विधान दोनदा केले आहे, ते जनता आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष कसं विसरतील? जनता उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची संधी देईल की नाही हे लवकरच समोर येईल.
सुप्रिया सुळे पहिल्या महिला मुख्यमंत्री?
लोकसभेत महाविकास आघाडीने न भूतो न भविष्यती अशी कामगिरी बजावली. स्ट्राईक रेटपासून सर्वच मापदंडावर चमत्कार घडवला. कमी जागा पदरात असताना पण कुरकुर न करता शरद पवार गटाने विजयश्री खेचून आणला. विधानसभेला पण जिथे बहुमत तिथे आम्ही हा फॉर्म्युला यश मिळवून देऊ शकतो. सध्या सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पश्चिम महाराष्ट्रातील बॅनर राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीकडे तर बोट दाखवत नाहीत ना?
जयंत पाटील घडवतील चमत्कार?
राज्याच्या राजकारणात काही जणांच्या गळ्यात अचानक मुख्यमंत्री पदाची माळ पडल्याचे उदाहरणं कमी नाहीत. पुलोदचा प्रयोग असो की आताचे महायुती, महाविकास आघाडीचे प्रयोग असो, राजकारणातील काही चर्चेत नसलेल्या व्यक्तींना पण मुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्याचे राजकीय इतिहासात डोकावल्यास दिसते. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जयंत पाटील यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत असतील, तर ते हलक्यात घेण्याचे काहीच कारण नाही.