शिवसेना आणिऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन या दोन परस्परविरोधी विचारधारा आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदा 2019 मध्ये एमआयएमने घुसखोरी केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील हे खासदार म्हणून निवडून आले. यावेळी त्यांना भुमरे यांनी आस्मान दाखवले. या दोन परस्परविरोधी विचारधारा एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. एआयएमआयएम विधानसभा निवडणुकीच्या फडात उतरली आहे. पक्षाने काही उमेदवारांच्या नावाची घोषणा पण केली आहे. तरीही महाविकास आघाडीत समावेश होण्याची एमआयएम प्रतिक्षा करत आहे. भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीला त्यांनी प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर संजय राऊत यांनी असे मोठे संकेत दिले आहेत.
महाविकास आघाडीने विचार करावा
महाराष्ट्राच्या रणधुमाळीत मुस्लीम पट्ट्यात ओवेसी पुन्हा एकदा मजलीसचा हुंकार भरणार आहेत. यापूर्वी त्यांना राज्याच्या राजकारणात चांगले यश आले होते. आता ते यशाचा फॉर्म्युला आजमावत आहेत. त्यामुळेच नांदेडच्या लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांनी जलील यांच्या उमेदवारीची लागलीच घोषणा केली. तर छत्रपती संभाजीनगर शहरातील तीन विधानसभा मतदारसंघावर त्यांचा डोळा आहे. या ठिकाणी एमआयएम मोठा उलटफेर करू शकते. मालेगाव आणि मुंबईतील काही पॉकेट एरियात एमआयएम निर्णायक कार्ड खेळू शकते.
तरीही स्वबळावर न लढता एमआयएम भाजप आणि शिंदे सरकारला थोपवण्यासाठी महाविकास आघाडीला साद घालत आहे. गेल्या काही दिवसांपासून ओवेसी आणि जलील सातत्याने महाविकास आघाडीकडे डोळे लावून बसले आहेत. जलील यांनी महाविकास आघाडीत प्रवेश देण्यात यावा म्हणून शरद पवार गट आणि काँग्रेसकडे प्रस्ताव पाठवल्याचा दावा केला होता. तर ओवेसी यांनी आताही हाच राग आलापला आहे. आता चेंडू महाविकास आघाडीच्या पारड्यात असल्याचे ते म्हणाले. महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने दारं उघडावीत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. या प्रस्तावावर महाविकास आघाडीकडून उत्तर आले नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान संजय राऊत यांनी या सर्व घडामोडींवर सूचक विधान केलं आहे.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया काय?
असदुद्दीन ओवेसी यांनी महाविकास आघाडीकडे असा प्रस्ताव पाठवल्याचे म्हटले आहे. तर यापूर्वी जलील यांनी काँग्रेस आणि शरद पवार गटाला असा प्रस्ताव पाठवल्याचे आणि शिवसेनेला प्रस्ताव पाठवला नसल्याचे म्हटले होते. या सर्व प्रकरणावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओवसी यांच्या एमआयएमला सोबत घेणार का? असा सवाल त्यांना विचारण्यात आला. तेव्हा पक्षाने प्रस्ताव ठेवला तर त्यावर चर्चा करण्याची तयारी त्यांनी दाखवली.