पक्षातील आऊटगोईंगमुळे अजित पवार चिंतेत, मुंबईत आज होणार तातडीची बैठक

| Updated on: Oct 08, 2024 | 8:58 AM

आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे.

पक्षातील आऊटगोईंगमुळे अजित पवार चिंतेत, मुंबईत आज होणार तातडीची बैठक
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us on

Maharashtra assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच आता सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. महाराष्ट्रात महाविकासआघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार आहे. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे.

अजित पवार गटाच्या सर्व आमदारांची आज मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पक्षातील सर्व आमदारांनी हजर राहावे, असे आदेश देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटातील अनेक नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे दुसऱ्या पक्षात प्रवेश घेत आहेत. सध्या पक्षात आऊटगोईंग सुरु असल्याने अजित पवार हे आमदारांशी संवाद साधणार आहेत.

अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर महत्त्वाची बैठक

अजित पवार गटातील सर्व आमदारांची आज संध्याकाळी 7.30 वाजता बैठक होणार आहे. अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत सध्या सुरु असलेल्या आऊटगोईंगवर चर्चा केली जाणार आहे. त्यासोबतच सर्व आमदारांच्या मतदारसंघात नेमकी काय स्थिती आहे, याबद्दलचाही आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे. यासोबतच या बैठकीत पक्षांतर्गत विधानसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित केला जाणार आहे.

बटन दाबताना घड्याळाचंच बटन दाबा – अजित पवार

दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार हे संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करत आहेत. आता नुकतंच अजित पवारांच्या उपस्थितीत सोमवारी व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवारांनी घड्याळाला मतदान करा, असे आवाहन जनतेला केले. “तुमच्याकडे कोणीही आले तर ते सांगतील ते ऐकून घ्या. पण बटन दाबताना घड्याळाचंच बटन दाबा. देशात स्मार्ट सिटी म्हणून बारामतीची ओळख झाली. तुम्ही फक्त घड्याळाचे बटन दाबा, पुढील पाच वर्षात या शहराचा चेहरा मोहरा अजून चांगला करायची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे”, असे अजित पवार म्हणाले.

“तुमच्या मनात जो उमेदवार आहे तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील”, असं मोठं विधानही अजित पवारांनी केलं. “पुन्हा मला येता येणार नाही. मला राज्यात फिरावं लागणार आहे. आता तुमची सर्वांची जबाबदारी व्यवस्थित पार पाडा”, असे निर्देशही अजित पवारांनी दिले.