MNS Amit Thackeray : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज अमित ठाकरे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. याआधी अमित ठाकरेंनी मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी शिवाजी पार्क येथे जाऊन बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळालाही अभिवादन केलं. तसेच गणपती मंदिरात जाऊन दर्शनही घेतले. यानंतर अमित ठाकरे हे मोठे शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यासाठी निघाले आहेत. यापूर्वी अमित ठाकरेंनी एक वक्तव्य केलं. त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
अमित ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. “मी देवाला मानतो. मी आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. मी देवाकडे काही मागत नाही. मी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नतमस्तक होणार आहे. माझ्या आजोबांच्या पाया पडणार आहे. तसेच प्रबोधनकार यांचेही आशीर्वाद घेणार. मला हे आशिर्वाद पुढे नेतील”, असे अमित ठाकरे म्हणाले.
यावेळी अमित ठाकरेंना सदा सरवणकर यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “मला माहित नाही”, असे उत्तर दिले. यावेळी अमित ठाकरेंनी “तुम्ही बाईट द्यायला बोलला की माझी धाकधुक वाढते”, असे गंमतीत म्हटले. “वरळीत संदीप देशपांडे नक्की जिंकतील. त्यांना जिंकायला मी नक्की प्रयत्न करेन. वरळीचे आमदार लोकांसाठी उपलब्ध नसायचे. पर्यावरण खात्याने काहीच काम केलं नाही”, असे अमित ठाकरे म्हणाले.
दरम्यान शिवसेनेचा बालेकिल्ला अशी माहीम विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. हा मतदारसंघ सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून माहीम मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे माहीम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तर महायुतीकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आले आहे. तसेच महाविकासाआघाडीच्या ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.