डोंबिवलीत शिंदे गटाला मोठं खिंडार, माजी नगरसेवकांचं एकाचवेळी बंड; ऐन निवडणुकीच्या तोंडावर धमाका

| Updated on: Oct 06, 2024 | 4:27 PM

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

डोंबिवलीत शिंदे गटाला मोठं खिंडार, माजी नगरसेवकांचं एकाचवेळी बंड; ऐन निवडणुकीच्या तोंडावर धमाका
Follow us on

Kalyan Dombivali Deepesh Mhatre Join Thackeray group : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक पक्षात इनकमिंग आऊटगोईंग सुरु झाले आहेत. त्यातच आता कल्याण डोंबिवलीत शिंदे गटाला मोठे खिंडार पडले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाचे युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी सात नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री रविंद्र चव्हाण आणि दिपेश म्हात्रे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले होते. यामुळे दिपेश म्हात्रे हे नाराज झाले होते. आता डोंबिवलीतील ठाकरे गटाने शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. शिंदे गटाचे प्रदेश सचिव दिपेश म्हात्रे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मशाल हाती घेतली. दिपेश म्हात्रेंसोबतच त्यांचे बंधू, माजी नगरसेवक जयेश म्हात्रे, रुपेश म्हात्रे, रत्नाताई म्हात्रे, सुलोचना म्हात्रे, संगीता भोईर, वसंत भगत, संपत्तीताई शेलार अशा सात माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

दिपेश म्हात्रे यांनी पक्षप्रवेश करण्यापूर्वी डोंबिवलीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. हाती घेऊन मशाल, घडवू महाराष्ट्र खुशाल अशा आशयाचे बॅनर संपूर्ण डोंबिवलीत झळकले होते. दिपेश म्हात्रे यांनी शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन मुंबईत दाखल झाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांचे स्वागत केले. तुम्ही परत आला याचा आनंद आहे. थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गुंडगिरी, जुलूमशाही लोकसभेतच गाडून टाकली असती, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“कल्याण-डोंबिवली पुन्हा शिवसेनामय करून दाखवा”

कल्याण-डोंबिवली हा शिवसेनेचा, हिंदुत्वाचा आणि शिवरायांच्या भगव्याचा बालेकिल्ला आहे. इथे भगव्याला गद्दारीचा डाग लावला, तो डाग धुवून टाका आणि मशालीच्या रुपाने भगव्याचे तेज प्रज्ज्वलित करा. कल्याण-डोंबिवली पुन्हा शिवसेनामय करून दाखवा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.

मी बाळासाहेबांचे विचार सोडले, शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली या सगळ्या भ्रमाला अनेक जण भुलले आणि त्यांच्या पालख्या वाहिल्या. तुमच्याही डोळ्यावर झापड बांधली गेली होती आणि आता सगळ्यांचे डोळे उघडले हे चांगले झाले. तुम्ही ज्याच्या आहारी गेला होतात ते हिंदुत्व, ती शिवसेना आणि ते विचार बाळासाहेबांचे नाही हे तुमच्याही लक्षात आले. महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार कदापि नव्हता आणि कधीच असू शकत नाही. तोच विचार घेऊन मी शिवसेना पुढे नेतोय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“…तर ही गुंडगिरी, जुलूमशाही लोकसभेतच गाडून टाकली असती”

“आम्ही जगू ते स्वाभिमानाने, लाचारी पत्करून नाही. हिंदुहृदयसम्राट आपल्याला सांगत आले की एकच दिवस जगायचे असेल तर वाघासारखे जगा शेळीसारखे नाही. आज अशा अनेक शेळ्या तिकडे शेपट्या हलवत भाजपची गुलामगिरी करत आहेत. तुम्ही परत आला याचा आनंद आहे. थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गुंडगिरी, जुलूमशाही लोकसभेतच गाडून टाकली असती. एका बाजुला प्रचंड ताकद, सत्ता, पैसा, झुंडशाही या सगळ्या गोष्टी असतानाही शिवसेनाप्रेमी मतदारांनी आपल्या सामान्य कार्यकर्तीला 4 लाख मतं दिली. शिवसेनेच्या साध्या कार्यकर्तीला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना यायला लागले. तरी देखील कल्याण-डोंबिवलीकरांनी जवळपास 4 लाख मतं भगव्याला दिली. त्या मतदारांचा अभिमान आहे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.