Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. त्यानुसार येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर लगेचच तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. त्यातच आता ठाकरे गटात अंतर्गत बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. काल मातोश्रीवर आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली.
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत काल मातोश्रीवर एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला ठाकरे गटाचे नेते, आमदार आणि काही वरिष्ठही सहभागी झाले होते. या बैठकीत विद्यामान आमदारांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच AB फॉर्मबद्दलही महत्त्वाची माहिती यावेळी देण्यात आली.
आदित्य ठाकरे यांनी या बैठकीत संभाव्य उमेदवारांसोबत चर्चा केली. या बैठकीला उद्धव ठाकरे हे अनुपस्थितीत होते. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया पार पडली. यामुळे तब्येतीच्या कारणात्सव ते बैठकीसाठी अनुपस्थितीत होते. या बैठकीत आदित्य ठाकरेंनी विद्यमान आमदारांना कामाला लागा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच यादी जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना AB फॉर्म दिले जातील, असेही या बैठकीत सांगण्यात आले.
मातोश्रीवरील बैठकीनंतर शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत त्यांनी मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रत्येकासोबत चर्चा केली. त्यांनी मतदारसंघातील काही अडचणी आहेत का? याबद्दलही त्यांनी जाणून घेतले. तसेच यादी जाहीर झाल्यानंतर लगेचच AB फॉर्म दिले जातील, असे सुधाकर बडगुजर यांनी बैठकीनंतर सांगितले.