मुंबई | कांद्याच्या कोसळलेल्या दरांवरुन सभागृह चर्चा झाली. सरकारनं नाफेडद्वारे कांदा खरेदी केल्याचा दावा केला. त्यावर आक्षेप घेत गेल्यावर्षीची आकडेवारी सरकारनं सांगितल्याचा आरोप विरोधकांनी केला. घसरलेल्या कांद्याचा भावाचा मुद्दा अधिवेशनात गाजतोय. एकीकडे शेतकरी कवडीमोल भावामुळे कांद्याचे लिलाव बंद पाडतायत. तर दुसरीकडे विरोधकांनी कांद्याची माळ घालून निदर्शनं केलीयत.
मातीमोल भावामुळे कुठे शेतकरी कांद्याच्या पिकावर गुरांना सोडतायत. तर कुठे रस्यांवर कांदे फेकून आंदोलनं होतायत. मात्र कांद्याचा भाव नेमका पडला कशामुळे ते सविस्तर समजून घेऊयात. मूळ हंगाम म्हणजे रब्बी हंगामातला कांदा हा बाजारात मार्च अखेरपर्यंत येतो. मात्र जानेवारी-फेब्रुवारीत निघणाऱ्या कांद्याला हंगामपूर्व कांदा म्हटलं जातं.
गेल्यावर्षी फेब्रुवारीत कांद्याला 20 रुपये भाव मिळाला होता. यावर्षी सुरुवातीला 14 ते 16 आणि त्यानंतर थेट 2 ते 4 रुपये किलोवर भाव घसरला.
हंगामपूर्व कांद्याचं उत्पादन याआधी देशातली काही ठराविक राज्यंच घेत होती, उदाहरणार्थ समजा महाराष्ट्र, बिहार आणि मध्य प्रदेशात हंगामपूर्व कांदा घेतला गेला तर त्याची निर्यात इतर राज्यात केली जायची., मात्र यंदा जवळपास सर्वच राज्यांनी हंगामपूर्व कांद्याची लागवड केलीय. म्हणून मागणी पुरवठ्याचं गणित बिघडल्यामुळे परिणाम दर घसरणीत झालाय.
यंदा देशात हंगामपूर्व कांद्याचा पेरा 10 टक्क्यांनी वाढलाय, त्यात हवामान अनुकल राहिल्यानं उत्पादनही वाढलं.एरव्ही हवामानामुळे ४० टक्के कांदा खराब व्हायचा., म्हणून फेब्रुवारीच्या हंगामात काद्यांला चांगला भाव मिळत होता. पण यंदा उत्पादन आणि आवक दोन्ही वाढलीय.
दुसरं म्हणजे फेब्रुवारीतला कांदा तातडीनं खराब होत असल्यामुळे शेतकऱ्याला तो विकावाच लागतो, पण एकाचवेळी कांदा मार्केटमध्ये आल्यामुळे हा फटका बसल्याचं बोललं जातंय.
शेतकरी म्हणतायत की नाफेडनं कांदा खरेदी सुरु करावी., यावर सरकारनं सांगितलंय की याआधीच नाफेकडून कांदा खरेदी सुरु झालीय. मात्र विरोधकांच्या दाव्यानुसार मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहिती ही गेल्यावर्षीची होती.
महत्वाचं म्हणजे केंद्रानं कांदा निर्यातीवर कोणतंही बंधन घातलेलं नाही., पण उत्पादनवाढीमुळे कांद्याचे भाव पडल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. एकीकडे महाराष्ट्रात कांदा शेतकऱ्यांना रडवत असला तरी इतर काही देशात कांद्याला सोन्याचा भाव आलाय.
महाराष्ट्रात कांद्याचा भाव २ ते ४ रुपये किलो आहे., तर मीडिया रिपोर्टनुसार तुर्कीत कांदा २५०० रुपये किलोनं विकला जातोय. तुर्कीतला भूकंप, पाकिस्तानातला महापूर, नेदरलँडमध्ये घटलेलं उत्पन्न यामुळे जगात कांद्याचा भाव वाढलाय.
इतर देशात कांद्याच्या दरवाढीतल टक्केरवारी बघितली तर तुर्की – 750% टक्क्यांनी कांदा महागलाय. पाकिस्तानात 372 टक्के, उजबेकिस्तानात 350 टक्के, युक्रेनमध्ये 275 टक्के कांदा महाग झालाय, फिलिपाईन्समध्ये 220 टक्के कांदा महागलाय.
केंद्र सरकारनं कांद्यावर निर्यातबंदी घातल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. मात्र कांद्याला नव्हे तर फक्त कांद्याच्या बियाण्याला निर्यातबंदी असल्याचं वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी सांगितलंय. तूर्तास नाफेडनं खरेदी वाढवून कांदा उत्पादकांना धीर देण्याची गरज आहे