राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे शिंदे सरकारचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी प्रत्येक पात्र कुटुंबाला मोफत तीन गॅस सिलिंडर देण्यात येणार असल्याची घोषणा शिंदे सरकारने केली आहे. महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर सुरक्षित इंधन दिलं पाहिजे. एलपीजी गॅस प्रत्येक घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर करत आहेत. ५२ लाख १६ हजार ४०० कुटुंबांना लाभ मिळेल. पर्यावरण संरक्षण केलं जाईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
शुभमंगल सामूहिक विवाह योजनेतील अनुदान १० हजार होते ते आता २५ हजार केलं आहे. स्तन गर्भाशय कर्करोगाच्या निदानासाठी आरोग्य केंद्रात ७८ हजार कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका देऊ. हर घर नल, हर घर जलसाठी १ कोटी २५ लाख ६६ लाख घरांना नळजोडणी दिली आहे. राहिलेल्या घरांचे काम प्रगतीपथावर आहे, असंही अजित पवार म्हणाले.
महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे. महिला धोरण आपण जाहीर केले होते. त्यात वेळोवेळी बदल केले. नुकतेच अष्टसुत्री महिला धोरण जाहीर केलं आहे. महिलांना पोषण आहार, रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना राबवणार, लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृयोजना आपण आणल्या. घर खरेदी साठी मुद्रांक शुल्क योजना, नोकरदार महिलांना करातून सूट, शक्ती योजना आदी योजना राबवत आहोत, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
स्त्री समाजाचा केंद्रबिंदू होत आहे. महिला कुटुंब आणि अर्थार्जन अशा दोन्ही पातळीवर महिला काम करत आहेत. मुली परीक्षांमध्ये अव्वल असतात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण घोषित करत आहोत. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबणासाठी २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना दर महा १५०० रुपये देणार आहे. या योजनेसाठी दरवर्षी ४६ हजार कोटी देण्यात येईल. जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल, असं म्हणत अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे.