पंकज भनारकर, Tv9 मराठी, मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांच्या नजरा विस्ताराकडे लागल्या आहेत. नेमके कोण मंत्री होऊ शकतात, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतायत, त्याप्रमाणं लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या अखेरीस विस्तार होण्याची शक्यता आहे. नुकतेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मुंबईत आले होते. नड्डांची शिंदे आणि फडणवीसांसोबत ‘वर्षा’ बंगल्यावर बैठकही झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. काही नावांवर चर्चा झाली असून मंत्रिमंडळ विस्ताराला ग्रीन सिग्नल मिळाल्याचं कळतंय.
मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग, सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मोकळा झालाय. सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यानं, सरकार टिकलंय.
त्यामुळं विस्तारासंदर्भात कोणतीही अडचण नाही. मात्र विस्ताराआधी, फडणवीसांनी आमदारांचेही कानही टोचलेत. पक्षाकडे मंत्रिपद मागण्यापेक्षा मी काय पक्षाला दिलं? हे सांगण्याची वेळ आहे, असं फडणवीस म्हणाले आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिक स्पर्धा आहे. संजय शिरसाट, भरत गोगावले, योगेश कदम, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड, चिमणराव पाटील, सुहास कांदे, बच्चू कडू शिंदे गटाकडून स्पर्धेत आहेत. भरत गोगावलेंनी फक्त मंत्रिपदच नाही, तर रायगडच्या पालकमंत्रिपदाचा शब्द देण्यात आल्याचा दावा केलाय. हे झालं शिंदे गटाचं, तर भाजपकडूनही कोणाला संधी मिळू शकते याबाबतची वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.
संजय कुटे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, राम शिंदे, नितेश राणे, देवयानी फरांदे आणि सीमा हिरे स्पर्धेत आहेत. सध्या 20मंत्र्यांवरच महाराष्ट्राचा कारभार सुरु आहे. पण लवकरच उर्वरित कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपदंही भरली जातील.
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार नेमका कुठल्या दिवशी होणार? याबाबत अजूनही स्पष्टीकरण झालेलं नाही. मंत्र्यांकडून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं सांगितलं जातंय. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला वेग आला आहे. येत्या 10 दिवसात राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासोबतच खातेपालटही होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराला केंद्राचा ग्रीन सिग्नल दिला आहे, अशी देखील माहिती समोर आली आहे.