बहुमताच्या लाटेवर स्वार होत आज महायुतीचे सरकार महाराष्ट्रात सत्तारूढ होत आहे. आज 5 डिसेंबर 2024 रोजी महायुती सरकारचा नेत्रदीपक शपथविधी सोहळा मुंबईत होत आहे. आझाद मैदान त्यासाठी सजलं आहे. राज्यातील विविध भागातून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. या ग्रँड शपथविधीसाठी लाडक्या बहिणींपासून ते चहावाला आणि अनेक दिग्गजांना आमंत्रण धाडण्यात आले आहे. विरोधी पक्षातील सर्वच ज्येष्ठ नेत्यांना आणि शिलेदारांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. आज भाजपाच्या गटनेते पदी निवड झालेले देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतील. पण इतरांचा शपथविधी लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे याविषयीचे वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. काय म्हणाले बावनकुळे?
1 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री यांची शपथ
आज कुणा-कुणाचे शपथविधी होतील, याविषयी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाकीत केले आहे. आज कोण शपथ घेणार याची यादी राज्यपालांकडे जाते. आज मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांचा आज शपथविधी होईल, असे चित्र दिसत असल्याचा अंदाज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. वरिष्ठ काय निर्णय घेतात याकडे सर्वांचेच लक्ष असल्याचे ते म्हणाले. महायुतीच्या तीन मोठ्या नेत्यांनी अथवा वरिष्ठांनी काही निर्णय घेतला, तर त्याची वाट पाहू असे बावनकुळे म्हणाले.
आज केवळ तिघांचा शपथविधी
आज केवळ तिघांचा शपथविधी होईल. संध्याकाळी कैबिनेट होईल, त्यात पुढचे निर्णय होतील. सध्या खातेवाटपाचा विषयच नाही, आधी मंत्रीपदी कोण येणार याचा निर्णय व्हायचा आहे. नागपूर अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे मत अनिल पाटील यांनी व्यक्त केल आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या मामाचा जल्लोष
अमरावतीत देवेंद्र फडणवीस यांचे मामा चंद्रकांत कलोती यांच्या घरी मिठाई वाटून जल्लोष केला. देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत असल्याने कलोती परिवार आनंदी तर मामा चंद्रकांत कलोती यांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले. मामाच्या परिवाराने दिल्या देवेंद्र फडणवीस यांच्या बालपणीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. देवेंद्र फडणीस यांनी अमरावतीसाठी आणखी चांगलं काम करावे अशी इच्छा मामांनी बोलून दाखवली. आज कलोती परिवार मुंबईत शपथविधीला हजर राहणार आहे.
संत-महंतांना निमंत्रण
महायुतीच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा होणार असून यासाठी वारकरी संप्रदाय सुद्धा या सोहळ्याचा साक्षीदार होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील इसरुळ येथील श्री संत चोखोबाराय मंदिरचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज पाटील याना या सोहळ्याचे निमंत्रण आले आहे. हभप पुरुषोत्तम महाराज या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मुंबईला गेले आहेत .