मुंबई: शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी त्यांच्या स्मारकाचा श्रीगणेशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. मुंबईच्या शिवाजी पार्कातील परिसरातील महापौर बंगल्यात बाळासाहेबांच्या स्मारकाचं गणेशपूजन झालं. आज सकाळीच महापौर बंगल्याचं नाव बदलण्यात आलं आहे. आता महापौर बंगला बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक असा ओळखला जाणार आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाच्या गणेशपूजनानिमित्त मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन करत, वाकून नमस्कार केला. शिवसेना युतीवरुन नेहमीच भाजपवर टीकास्त्र सोडत असताना, आजचं चित्र युतीबाबत सकारात्मक असल्याचं पाहायला मिळालं.
फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा गणेश पूजन कार्यक्रम संपन्न झाला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक ताबा पत्र आणि करारनामा हस्तांतरणाचा कार्यक्रमही पार पडला. एरव्ही एकमेकांना शाब्दिक बुक्के देणारे दोन्ही नेत्यांनी आज फुलांच्या बुकेची देवाण-घेवाण केली. यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींसह शिवसेनेचे बडे नेते उपस्थित होते.
Mumbai: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis hands over Mayor’s bungalow documents to Bal Thackeray Memorial Trust headed by Shiv Sena Chief Uddhav Thackeray for Bal Thackeray Memorial. pic.twitter.com/QKAozBS6zR
— ANI (@ANI) January 23, 2019
आज शिवसेनाप्रमुखांची 93 वी जयंती आहे. या जयंतीनिमित्त असंख्य शिवसैनिक स्मृतीस्थळावर येत आहेत. तर बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधत ठाकरेंच्या स्मारकाचं गणेशपूजन करण्यात आलं.
दुसरीकडे एका शिवसैनिकाने 36 हजार रुद्राक्षामधून बाळासाहेबांची प्रतिमा तयार केली आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या 93व्या जयंतीनिमित्त मुंबईतील चेतन राऊत या कलाकाराने 36 हजार रुद्राक्षांनी शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा साकारत अनोख्या पद्धतीने त्यांना अभिवादन केले आहे. शिवसेना भवनासमोरच ही प्रतिमा साकारण्यात आली आहे.