Maharashtra CM Swearing-in Ceremony : महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज गुरुवारी ५ डिसेंबर २०२४ रोजी पार पडणार आहे. हा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. यासाठी जय्यत तयारीही सुरु आहे. या सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि देशातील सर्वच राज्यातील मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक लोक उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमादरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक परिपत्रक जारी केले आहे.
मुंबईतील वाहतूक पोलिसांनी नुकतंच एक परिपत्रक जारी केले आहे. राज्यात स्थापन होणाऱ्या नवनिर्वाचित मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा आझाद मैदानात गुरूवारी होत आहे. त्यानिमित्त आझाद मैदान आणि आसपासच्या परिसरातील वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल केले जाणार आहेत. हे बदल आज दुपारी १२ वाजल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत लागू राहणार आहे. यावेळी आझाद मैदान परिसरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने नागरिक आणि कार्यकर्त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
आज ५ डिसेंबर रोजी शपथविधी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत मोठे बदल होणार आहेत. गुरूवारी दुपारी १२ वाजल्यापासून हा कार्यक्रम संपेपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. आझाद मैदान परिसरात पार्किंगची व्यवस्था उपलब्ध नसल्याने शपथविधीसाठी येणाऱ्यांनी लोकलचा वापर करावा, असे मुंबई वाहतूक पोलिसांनी सांगितले.
मुंबईतील शपथविधीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन (सीएसएमटी जंक्शन ) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) दरम्यान दोन्ही मार्ग बंद ठेवले जाणार आहेत. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी एल. टी. मार्ग, चकाला जंक्शनवरून उजवे वळण – डी. एन. रोड छत्रपती शिवाजी महाराज – जंक्शन (सीएसएमटी जंक्शन) या पर्यायी मार्गाचा वापर करावा.
तसेच विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी महात्मा गांधी मार्गही आवश्यतेनुसार बंद ठेवण्यात येणार आहे. वाहन चालकांनी एल.टी. मार्ग चकाला जंक्शनवरून उजवे वळण – डी. एन रोड, सीएसएमटीवरून इच्छितस्थळी मार्गस्थ व्हावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
In view of the swearing-in ceremony at Azad Maidan Ground on 05/12/2024, a large number of people are expected to attend the function.
To ease vehicular movement, following traffic arrangement will be in place on 05/12/2024 from 12.00 pm till end of the program. pic.twitter.com/cuVjk1GQF3
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) December 4, 2024
यासोबतच हजारीमल सोमानी मार्गावरील वाहतूक चाफेकर बंधू चौक (ओ. सी. एस. जंक्शन) ते छत्रपती शिवाजी महाराज जंक्शनपर्यंत (सीएसएमटी जंक्शन) वाहतूक प्रतिबंधित असेल. याठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून चाफेकर बंधू चौक (ओ. सी. एस. जंक्शन) हुतात्मा चौक – काळा घोडा, के. दुभाष मार्ग – शहिद भगतसिंग मार्गाचा वापर करावा. तसेच प्रिन्सेस स्ट्रिट पूल (मेघदुत ब्रिज) (दक्षिण वाहिनी) (एन. एस. रोड, तसेच सागरी किनारा मार्गाने श्यामलदास गांधी जंक्शनकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद ठेवण्यात येईल. येथून जाणारी वाहने एन. एस. रोड मार्गे वळविण्यात येणार आहेत.
यासोबतच रामभाऊ साळगांवकर रोड (एक दिशा मार्ग) रामभाऊ साळगांवकर रोडवरील इंदु क्लिनिक जंक्शन (सय्यद जमादार चौक ते व्होल्गा चौक सर्व प्रकारच्या वाहनांसाठी दुहेरी मार्गिका दुपारी १२.०० वा. ते २०.०० पर्यंत खुली करण्यात येत आहे. नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या अनुषंगाने आझाद मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि अतिमहत्त्वाचे व्यक्ती येणार आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांनी, तसेच कर्मचाऱ्यांनी आझाद मैदान व छत्रपती शिवाजी टर्मिनस (सी एस एम टी) येथून प्रवास करताना योग्य नियोजन करावे. तसेच पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आदेश जारी केले आहेत.