Maharashtra corona report today : जळगावात जनता कर्फ्यू, नाशिकमध्ये बाजारपेठा पूर्णपणे बंद, बुलडाण्यात टाळेबंदी

| Updated on: Mar 09, 2021 | 7:00 PM

राज्य सरकारनं दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. त्यात बुलडाणा, जळगाव आणि नाशिक जिल्हा प्रशासनानं काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

Maharashtra corona report today : जळगावात जनता कर्फ्यू, नाशिकमध्ये बाजारपेठा पूर्णपणे बंद, बुलडाण्यात टाळेबंदी
कोरोना चाचणी करताना डॉक्टर्स
Follow us on

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचं संकट अधिक गहिरं होत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशात कोरोना रुग्ण सापडलेल्या घटनेला मंगळवारी बरोबर 1 वर्ष पूर्ण झालं. मधल्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. पण आता पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारनं दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासनाकडून मोठे निर्णय घेण्यात येत आहेत. त्यात बुलडाणा, जळगाव आणि नाशिक जिल्हा प्रशासनानं काही महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.(Big decision of Nashik, Buldana, Jalgaon administration on the background of increasing corona)

बुलाडाण्यात टाळेबंदी कायम

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढतच आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. जिल्हात मंगळवारी कोरोनाचे 579 नवे रुग्ण आढळून आले आहेत. या नव्या रुग्णांसह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 22 हजार 400 वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 203 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 3 हजार 29 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना म्हणून जिल्ह्यात 16 मार्चपर्यंत टाळेबंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

जळगाव जिल्ह्यात 3 दिवस जनता कर्फ्यू

जळगाव जिल्ह्यासह शहरात कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी शुक्रवार, शनिवार व रविवार असा 3 दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. या 3 दिवसात शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता बहुतांश बाजारपेठा बंद राहणार आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील जनतेने जनता कर्फ्यूचं पालन करावं असं आवाहन गुलाबराव पाटील यांच्यासह प्रशासनाने केलं आहे.

शहराच्या हद्दीत ११ मार्च रोजी रात्री 8 पासून जनता कर्फ्यू सुरू होणार आहे. तो १५ मार्च रोजी सकाळी 8 वाजता संपणार आहे. या दरम्यान, आपत्कालीन सेवा वगळता अन्य सेवा बंद राहणार आहेत. या जनता कर्फ्यूसाठी व्यापारी आणि जनतेनं यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.

नाशिकमध्ये शनिवार, रविवारी बाजारपेठा बंद

नाशिकमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शनिवार आणि रविवारी बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात येणार आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. इतकच नाही तर नाशिकमधील धार्मिक स्थळांबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील सर्व धार्मिक स्थळं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंतच सुरु ठेवण्यात येणार आहेत. तसंच शनिवार आणि रविवारी सर्व धार्मिक स्थळं बंद ठेवण्यात येणार आहेत. शाळा, महाविद्यालय आणि खासगी कोचिंग क्लासेसही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यात कोरोनाचा उद्रेक

पुण्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे 1 हजार 86 नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात 795 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या 24 तासांत 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातील 5 जण हे पुण्याबाहेरील आहे. सध्या पुण्यात 321 गंभीर स्वरुपाच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

नागपुरात कोरोनाचं थैमान कायम

नागपुरात मंगळवारी पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. दिवसभरात 1 हजार 338 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 997 इतकी आहे. नागपुरातील कोरोना रुग्णांची एकूण आकडेवारी पाहिली तर आतापर्यंत 1 लाख 60 हजार 343 रुग्ण आढळले आहेत. त्यातील 1 लाख 44 हजार 525 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 4 हजार 407 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ठाण्यात सरसकट लॉकडाऊन नाही

ठाण्यात कोणत्याही प्रकारचा सरसकट लॉकडाऊन करण्यात आलेला नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवाना बळू पडू नका, असं आवाहन करतानाच केवळ सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र असणाऱ्या ठिकाणीच निर्बंध घालण्यात आले आहेत, असं ठाणे महापालिकेने म्हटलं आहे. वाढत्या संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने तातडीने उपाय योजना करण्यात येत आहेत. ज्या परिसरात कोरोनाचा संसर्ग जास्त आहे त्या परिसरात हॅाटस्पॅाटची निर्मिती करण्यात आली आहे. या हॅाटस्पॅाट क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी कोविडचे रुग्ण सापडले आहेत, त्या ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहे. या सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रामध्येच निर्बंध घालण्यात आले आहेत. कोरोनाचा संसर्ग आहे ती इमारत, त्या इमारतीमधील मजला तिथेच 31 मार्च 2021 पर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. ऊर्वरित ठिकाणचे सर्व व्यवहार यापूर्वी जसे सुरू होते, त्यानुसार सुरू राहतील, असं पालिकेने स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईत सध्या लॉकडाऊनची गरज नाही, पण…; महापालिका आयुक्तांनी दिला ‘हा’ इशारा

Amravati Corona Update | अमरावतीकर घेणार ‘मोकळा श्वास’, लॉकडाऊनमध्ये शिथिलता, काय सुरु, काय बंद?

Big decision of Nashik, Buldana, Jalgaon administration on the background of increasing corona