मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय. अमरावती नागपूर पाठोपाठ आता पुण्यातही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मोहीम हाती घेतली आहे. स्थानिक पातळीवरही जिल्हाधिकाऱ्यांकडून कडक नियमावली जारी करण्यात आलीय. अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. शाळाही बंद करण्यात आल्या आहेत. अशास्थितीतही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे.(What is the status of corona in Pune, Nagpur, Amravati, Wardha and Washim districts?)
राज्यातील कोरोनाची स्थिती पाहायची झाली तर कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवारी दिवसभरात कोरोनाचे 10 हजार 187 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात दिवसभरात 47 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईची आकडेवारी पाहिली तर मुंबईत शनिवारी 1 हजार 188 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 5 कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे.
अमरावती, नागपूर पाठोपाठ आता पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. पुणे शहरातील आकडेवारीवर नजर टाकायची झाली तर दिवसभरात 963 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 659 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. पुण्यात आज 9 जणांचा मृत्यू झालाय. त्यातील 5 रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 6 हजार 460 रुग्णांपैकी 321 रुग्ण गंभीर तर 672 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुण्यात दिवसभरात 7 हजार 609 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.
गंभीर कोरोनाबाधितांची संख्या ३२१ !
पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ६ हजार ४६० रुग्णांपैकी ३२१ रुग्ण गंभीर तर ६७२ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 6, 2021
शनिवारी नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर पाहायला मिळाला. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1 हजार 183 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 860 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या 24 तासांत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 860 आहे. चाचण्यांचा आकडा पाहिला तर 24 तासांत 10 हजार 788 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
अमरावती जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात कोरोनाचे 631 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. तर 806 जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 39 हजार 78 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील 31 हजार 555 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण मृत्यूचा आकडा पाहिला तर 555 जणांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता 7 हजार 523 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
वर्धा जिल्ह्यातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 194 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या 6 दिवसांची आकडेवारी पाहिली तर 962 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, आज 183 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 13 हजार 314 रुग्ण आढळले आहेत. तर 358 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या 1 हजार 125 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
पश्चिम विदर्भात कोरोना संसर्ग वाढत आहे. वाशिम जिल्ह्यात गेल्या बारा दिवसात 2 हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं कोरोनाला आळा घालण्यासाठी 28 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सर्व दुकाने, आस्थापना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळं जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत रोज सायंकाळी 5 पासून सकाळी 9 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू आहे. तर आज सायंकाळी 5 ते सोमवारी सकाळ 9 पर्यंत 38 तासांची संचारबंदी लागू असणार आहे. संचारबंदी काळात दूध विक्रेते, डेअरी यांना सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. तर दवाखाने, मेडिकल दुकाने 24 चालू राहणार आहेत. तसे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत.
लातूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 108 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यासह लातूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 25 हजार 689 झाली आहे. त्यातील 24 हजार 241 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात 736 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 446 रुग्णांवर त्यांच्या घरीच उपचार सुरु आहेत. तर 290 रुग्ण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. रोज वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या :
राज ठाकरे मास्क घालत नाहीत! पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा मोठा निर्णय
कोरोनाने घेरले, नागपूर आज आणि रविवारी बंद; मिनी लॉकडाऊनही सुरू
What is the status of corona in Pune, Nagpur, Amravati, Wardha and Washim districts?