महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. त्यानंतर सर्वांना 23 नोव्हेंबर अर्थात निकालाच्या दिवसाची प्रतिक्षा होती. मतदानानंतर अनेक एक्झिट पोलनुसार, महाविकास आघाडीचं सरकार येईल, तसेच मविआ सहज 100 पेक्षा अधिक जागांवर विजयी होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र एक्झीट पोलचे सर्व अंदाज फोल ठरले आहेत. राज्यातील मतदारांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिलंय. तसेच भाजप हा महायुतीतला मोठा भाऊ ठरला आहे. एकट्या भाजपचे 120 पेक्षा अधिक उमेदवार जिंकून आले आहेत. या विजयानंतर भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. तसेच फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत प्रतिक्रिया दिली.
मतदानाआधी आणि मतदानानंतर कुणाचा मुख्यमंत्री होईल? अशी चर्चा होती. मात्र आता निकालानंतर महायुतीचा मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? हे अजून स्पष्ट नाही. आता देवेंद्र फडणवीस माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्रिपदाबाबत काय म्हणाले? हे जाणून घेऊयात.
“मुख्यमंत्रिपदावरुन आमच्यात कोणताही वाद नाही. महायुतीतील सीएम पदावरुन वाद होणार नाहीत. तसेच एकनाथ शिंदे, अजित पवार आमच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करतील”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी या महाविजयानंतर माध्यमांशी संवाद साधताना मतदारांचे आभार मानले. तसेच विरोधकांवरही प्रतिक्रिया दिली. विरोधकांनी आत्मचिंतन करावं. विरोधकांनी पराभवाची खरी कारणं शोधावीत असंही फडणवीस यांनी म्हटलं.
“महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी असल्याचं आजच्या निकालाने हे स्पष्ट झालं आहे. आमच्या एकजुटीचा हा सर्वात मोठा विजय आहे. विविध संतांचा देखील हा विजय आहे. लाडक्या बहिणींचे विशेष आभार मानतो. तसेच अमित शाह आणि नड्डा यांचेही विशेष आभारी आहे”, अशा शब्दात देंवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील मतदारांसह, लाडक्या बहिणी आणि राष्ट्रीय नेतृत्वाचे आभार मानले.
“माझा या विजयात खूप छोटा सहभाग आहे. आम्ही टीम म्हणून काम केलं. आम्ही विरोधकांचा सन्मान करु, त्यांची बाजू ऐकून घेऊ. तसेच मराठा आणि ओबीसी समाज आमच्यासोबत होता आणि आणि असणार आहे”, असंही देंवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.