Maharashtra extend lockdown मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी राज्याला संबोधित केलं. (Maharashtra extend lockdown) यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊन 14 एप्रिलनंतरही कायम ठेवणार असल्याचं जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांनी आणखी 16 दिवस लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे महाराष्ट्रात आता 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून, कोरोना महामारीच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. त्यानंतर मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संध्या. पाच वाजता महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मी 2 ते 3 दिवसातून तुमच्यासमोर येत आहे. आज येण्याचा कोणताही विचार नव्हता. लॉकडाऊन संपण्याच्या दिवशी रविवारीच तुमच्याशी बोलण्याचा विचार होता. मात्र, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. यात पंतप्रधानांसोबत आमच्या सर्वांच्या तोंडावर पट्ट्या (मास्क) बांधलेल्या होत्या. आमच्या तोंडावर पट्ट्या बांधणं कुणालाही शक्य झालं नाही, मात्र कोरोना विषाणूने ते केलं.
पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेतल्यानंतर वेगवेगळ्या बातम्या येण्यापेक्षा मीच या बैठकीचे तपशील तुम्हाला देण्याचा निर्णय घेतला. सर्वांना वाटेल की परिस्थिती काय आहे आणि याला गाणं सुचतं आहे. “…..” महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. पुणे हे कोरोना संसर्गाचं प्रवेशद्वार ठरलं. त्यावेळी आपल्याला या देशांची यादी मिळाली आपण त्यांची तपासणी केली मात्र, काही देशांची तपासणी झाली नाही आणि कोरोनाचा संसर्ग वाढला. त्यावर आता बोलण्यात अर्थ नाही. मात्र, आत्ता जे रुग्ण वाढत आहेत ते रोखण्यासाठी जिथं रुग्ण आढळले ते परिसर सील करण्यात येत आहेत.
महाराष्ट्रात ३३ हजार चाचण्या
आपण आता कोरोना रुग्ण समोरुन येऊन चाचणी करण्याची वाट पाहत नाही, तर त्यांच्या घरी जाऊन चाचणी घेत आहोत. आतापर्यंत महाराष्ट्रात ३३ हजार चाचण्या झाल्यात. केवळ मुंबईत 19 हजार चाचणी झाल्या आहेत. त्यापैकी 1000 रुग्ण आढळले. मात्र, या रुग्णांमध्ये सूक्ष्म ते अतिसूक्ष्म लक्षणं आहेत. केवळ 60 ते 70 टक्के लक्षणं असल्यानं आपण त्यांच्यावर उपचार करुन त्यांना घरी सोडत आहोत.
ज्येष्ठांना जपा
ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्यात 60 वर्षांहून अधिक व्यक्तींचा समावेश आहे. त्यांना कोरोना संसर्गाव्यतिरिक्त इतरही मोठे आजार होते. काही प्रकरणांमध्ये हे रुग्ण शेवटच्या टप्प्यात आल्याचं लक्षात आलं. त्यामुळे मी सांगेल, की घराबाहेर पडू नका, महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडलेच तर मास्कचा वापर करा, घरातील ज्येष्ठांना जपा, त्यांच्यापासून अंतर राखा. आम्ही सर्व मुख्यमंत्री देखील मास्कचा वापर करत आहोत खबरदारी घेत आहोत.
14 एप्रिलनंतर महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम
आपण कोरोना संसर्गाचा वेग मंद राखण्यात यशस्वी झालो आहोत. मात्र, मला ही रुग्णांची संख्या शून्य करायची आहे. आता कोरोना रुग्णांची साखळी तोडण्याचा प्रयत्न करतो आहे. जगभरात यासाठी प्रयत्न केले जात आहे. पंतप्रधानांच्या बैठकीत मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पहिल्यांदा बोलण्याची संधी दिली. त्यावेळी मी सर्व माहिती देताना शेवटी हेच सांगितलं आहे की देशात लॉकडाऊन वाढो अथवा नाही, पण मी महाराष्ट्रात 14 एप्रिलनंतर महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवणार.
मुंबई, पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे हे करणं आवश्यक आहे. महाराष्ट्र नेहमीच देशाला आणि जगाला दिशा दाखवत आला आहे. या कोरोनाच्या स्थितीत देखील आपण देशाला आणि जगाला दिशा दाखवणार आहोत.
हे किती दिवस चालणार असं अनेकजण विचारतात, तर मी त्यांना सांगेल की जितकी आपण शिस्त पाळाल तितका तो लवकर संपेल. 30 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन राहिल. त्यादरम्यानच्या काळात काय नियोजन आहे आणि काय करायचं आहे या सूचना देण्यासाठी मी पुन्हा तुमच्याशी बोलेल.
आजपर्यंत आपण जे धैर्य दाखवलं आणि आपल्या सरकारवर विश्वास दाखवला त्याबद्दल मी आभारी आहे. सर्व देशात वेगवेगळ्या पक्षांचे मुख्यमंत्री आहेत, मात्र ते एकत्र येऊन कोरोनाशी लढत आहेत. मोदीजी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत आहे. यात राजकारण नको. राजकारण आपल्या पाचवीलाच पुजलं आहे, मात्र, यास्थितीत राजकारण नको. पक्षीय राजकारणाला येथे जागा नाही. यातून बाहेर पडून नक्कीच आपण जागतिक महासत्ता बनू शकतो.
14 एप्रिलपासून किमान 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन
ज्याला ज्याला वर्क फ्रॉम करणं शक्य आहे त्याने त्याने वर्क फ्रॉम सुरु करा. आपल्याला 14 एप्रिलपासून किमान 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवावा लागणार आहे. किमान या शब्दावर मी मुद्दाम जोर देतो आहे. या काळात काही प्रमाणात निर्बंध करण्याबाबत सूचना दिल्या जातील. हा विचित्र व्हायरस आहे त्यामुळे तुम्ही शिस्त पाळा.
तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो. आम्ही हे युद्ध जिंकणारच, कारण हरलेल्या मानसिकतेने युद्ध जिंकता येत नाही. त्यामुळे हे युद्ध आपण जिंकणारच यासह मी पुन्हा तुम्हाला शिस्त पाळण्याचं आवाहन करतो.
परिस्थिती नियंत्रणात असलो तरी गाफिल राहून चालणार नाही असंच सर्व मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं. महाराष्ट्रात पहिला कोरोना रुग्ण सापडून सोमवारी (13 एप्रिल) 5 आठवडे होतील. हा कालावधी मोठा आहे. या काळात आपण गुणाकारात वाढणारा कोरोना काही प्रमाणात का होईना नियंत्रणात आणला आहे. मात्र, मला ही संख्या कमी किंवा नियंत्रणात नको आहे तर शून्य हवी आहे.
शेतीच्या कामावर निर्बंध नाहीत
लॉकडाऊन जरी कायम ठेवला तरी आपल्याला आता एकूण परिस्थितीचं गांभीर्य कळालं आहे. काय करायला हवं ते लक्षात आलं आहे. आपण आजपर्यंत लॉकडाऊनमध्ये देखील शेतीच्या कामावर आपण कुठलेही निर्बंध आणलेले नाहीत. शेतीविषयीची जी कामं आहेत ती चालू आहेत. शेतीतील माल, अवजारं असतील, बी बियाणं असेल, खत असेल काहीही असेल त्याला कुठंही आपण बंद केलेलं नाही. यापुढेही करणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरुच राहिल. पण 14 एप्रिलनंतर कुठंही मला गोंधळ नको आहे. माझ्या महाराष्ट्राने छान धैर्य दाखवलं आहे, हिंमत दाखवली आहे.
मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांसोबत संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे चर्चा केली (PM Narendra Modi Video Conference With All CM). या बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली. यावेळी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची भूमिका घेतली. केंद्र सरकारनेच लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करावी, अशी भूमिका सर्वांची होती.
महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे हे अनुकूल असल्याचं आधीपासूनच सांगण्यात येत होतं.
संबंधित बातम्या
लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बैठक, मोदी-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील 10 मुद्दे