मुंबई | 10 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्रात सध्या तीन पक्षांचं सरकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात सत्तेत सहभागी झालाय. अजित पवार सत्तेत सहभागी होताच सत्ताधारी शिवसेना पक्षात मंत्रिपदावरुन धुसफूस सुरु झाल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे शिंदे सरकारमधील काही आमदारांनी उघडपणे याबाबतची नाराजी देखील व्यक्त केली होती. या दरम्यान नव्या मंत्र्यांसाठी खातेवाटप करण्यात आलं. या वाटपात काही विद्यमान मंत्र्यांच्या खात्यांमध्येही आदलाबदल करण्यात आली. त्यानंतर मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार रखडला आहे. हा विस्तार लवकरच होणार आहे. तसेच पालकमंत्र्यांची घोषणा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सावध पावलं उचलली जात आहेत.
भारताचा स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट आता जवळ आलाय. या दिवशी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये त्या जिल्ह्याचे पालकमंत्री झेंडावंदन करतात. पण पालकमंत्र्यांची यादी सध्या जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यात कोण झेंडावंदन करणार? असा प्रश्न होता. या प्रश्नावर शिंदे सरकारने तोडगा काढला आहे. पालकमंत्रीपदाचा वाद होऊ नये यासाठी राज्य सरकारने नवा मार्ग काढला आहे. राज्य सरकारने 15 ऑगस्टला ध्वजारोहणासाठी यादी जाहीर केली आहे. पालकमंत्रीपदाचा वाद टाळण्यासाठी तात्पुरती ध्वजारोहणाची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ज्या जिल्ह्यांची नावे नाहीत तिथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात येणार आहे.