मुंबई : सामान्यांना पँट उतरवण्याची वेळ आली, तेव्हा सरकारनं खासगी दवाखान्यांच्या बेसुमार खर्च आणि मनमानीला ब्रेक लावण्याची हिंमत दाखवली. जेव्हा राज्यात रोज 70 हजार रुग्ण निघाले, तेव्हा काही खासगी रुग्णालयांनी खोऱ्यानं पैसा खेचला. आता जेव्हा रोजची रुग्णसंख्या 15 हजाराच्या आत आलीय, तेव्हा सरकार दर निश्चित करुन स्वतःची पाठ थोपठून घेतंय. आता कोरोनाचा उपचार खर्च किती असेल, हे शहराच्या वर्गीकरणावरुन ठरणार आहे (Maharashtra Government fix rate for corona treatment what about implementation).
जर तुम्ही अ वर्ग शहरातल्या साधारण वॉर्डात अॅडमिट असाल, तर तुम्हाला दिवसाला 4 हजार खर्च येईल. ब वर्गातल्या शहरात दाखल असाल, तर दिवसाचा खर्च 3 हजार आणि क वर्गातल्या शहरातल्या दवाखान्यात असाल तर दिवसाचा खर्च 2400 रुपये निश्चित करण्यात आलाय. जर रुग्णाला व्हेंटिलेटर किंवा आयसीयूमध्ये दाखल केलं असेल, तर अ वर्गाच्या शहरांत दिवसाचा खर्च 9 हजार, ब वर्गाच्या शहरात दिवसाचा खर्च 6700 आणि क वर्गाच्या शहरात दिवसाचा खर्च 5400 इतका असेल.
जर रुग्ण फक्त आयसीयूमध्ये असेल, तर अ वर्ग शहरात दिवसाचा खर्च 7500 रुपये, ब वर्ग शहरात 5,500 रुपये आणि क वर्ग शहरात 4,500 रुपये दरानुसार पैसे आकारले जातील. या खर्चात रुग्णांची देखरेख, बेड, नर्सिंग, औषधं आणि जेवण यांचाही समावेश आहे. त्यामुळे या गोष्टींसाठी इतर पैसे मोजावे लागणार नाहीत, मात्र जर रुग्णाला महागडी औषधं, तपासणी खर्च आणि इतर मोठ्या चाचण्या कराव्या लागल्या, तर त्यांचा खर्च वेगळा द्यावा लागेल.
अ वर्ग शहरात मुंबई, पुणे आणि नागपूरचा समावेश आहे. ब वर्ग शहरात नाशिक, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, नांदेड, सांगली, औरंगाबाद ही शहरं येतात. क वर्गात इतर सर्व जिल्ह्यांचा समावेश होतो.
महाराष्ट्रात अनेक जण खासगी दवाखान्यांच्या सर्वसाधारण वॉर्डात दाखल झाले. ना त्यांना ऑक्सिजन लागला, ना इतर महागडी औषधं. मात्र, तरी सुद्धा अनेकांची आयुष्यभराची कमाई रुग्णालयांमध्ये खर्च झाली. अंगावर आजार काढू नका, असं सरकार वारंवार आवाहन करत होतं. मात्र, अव्वाच्या सव्वा बिलं पाहून सामान्य लोक दवाखान्याची पायरी चढण्याची हिंमत कुठून आणणार, हा प्रश्न सरकारला पडलाच नाही. आता वऱ्हातीमागून घोडं आलंय खरं, मात्र किमान या ठरवलेल्या दरांची नीट अंमलबजावणी व्हावी, ही अपेक्षा आहे.
हेही वाचा :
व्हिडीओ पाहा :
Maharashtra Government fix rate for corona treatment what about implementation