मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नोकर भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आलीय. कोरोना संकटामुळे दोन वर्ष नोकर भरतीची जाहिरात निघाली नाही. त्यामुळे वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना नोकर भरतीसाठी अर्ज करता येत नव्हता. या नोकर भरतीसाठी वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांनी दोन वर्ष वाढवून देण्याची मागणी केलेली. विद्यार्थ्यांची ही मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. सरकारने याबाबतचा आदेश काढला आहे. सरळ सेवेत भरल्या जाणाऱ्या पदांमध्ये भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्ष वाढवून देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात लाखो विद्यार्थ्यांची सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. ते सरकारी नोकरी मिळवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतात. अनेकांना त्यामध्ये यश मिळतं. तर काहींना त्यात लवकर यश मिळत नाही. त्यामुळे ते प्रत्येक नोकर भरतीला प्रयत्न करतात. या दरम्यान काहींची वयोमर्यादा संपते. कारण नोकर भरतीच्या निकषांमध्ये वयाचीदेखील अट असते.
वयोमर्यादाच्या अटीमुळे काहींना परीक्षा देण्यापासून मुकावं लागतं. या अटीमुळे लॉकडाऊननंतर अनेकांना फटका बसला. कारण कोरोना संकट काळात लॉकडाऊनमुळे दोन वर्ष नोकर भरती रखडली. त्यानंतर जाहीर झालेल्या नोकर भरतीला अर्ज करण्यापासून काही विद्यार्थ्यांना मुकावं लागलं. याच गोष्टीचा विचार करत राज्य सरकारने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. त्यामुळे वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना सरळसेवा भरतीसाठी दिलासा मिळाला आहे.
कोरोना संकटाआधी अनेक विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल केला होता. पण कोराना संकट काळात त्यांची वयोमर्यादा शिथिल करण्यात आली होती. याशिवाय कोरोना संकटानंतर भरती पुन्हा जाहीर करण्यात आली. पण ती पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत शिथिलता मिळेल का याबाबत साशंकता होती. सरकारने वयोमर्यादेत शिथिलता द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. त्यानंतर सरकारने त्याबाबतचा निर्णय घेतला होता.