मुंबई | 14 ऑगस्ट 2023 : ठाणे जिल्ह्यातील कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत 18 रुग्ण दगावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यातच मृत्यूचं तांडव निर्माण झाल्याने त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे यांना घेरलं आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. काहीही घडलं की उठसूट हेलिकॉप्टरने फिरणारे मुख्यमंत्री कुठे आहेत?, असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसेच आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही त्यांनी मागणी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
मुख्यमंत्री महाबळेश्वरला उपचारासाठी गेले आहेत. जाऊ शकतात. 18 रुग्ण मेले, त्यांचा आक्रोश कुणी ऐकायचा? ठाण्यातील आक्रोश कुणी ऐकायचा? एरव्ही मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाऊन मदत केल्याचं नाटक करतात. ज्या ठाण्याचं प्रतिनिधीत्व ते करतात तिथे मात्र पोहोचले नाहीत. हे दुर्दवे आहे. इतर कुणाची सत्ता असती अन् हे झालं असतं तर अमित शाह इथे आले असते आणि विचारणा केली असती, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला.
भाजपचे पोपटलाल कुठे आहेत? नेहमी कोव्हिड घोटाळ्यावर बोलणाऱ्यांनी या मृत्यूच्या तांडवाबाबत जाब का विचारला नाही? हा कुणाचा घोटाळा आहे? मुंबई ठाण्यासह 14 पालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट नाही. तिथे प्रशासक आहे. त्यामुळे कुणाचाही कुणात पायपोस राहिला नाही. महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट असती तर हे टाळता आलं असतं.
मुख्यमंत्री आणि भाजपच्या हट्टामुळे लोकप्रतिनिधींची राजवट नाही. त्यामुळे लोकांना मरणाला सामोरे जावं लागत आहे. अन् मुख्यमंत्री विश्रांती घेत आहेत हे दुर्देव आहे. आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्यांचा राजीनामा घ्यावा असं भयंकर कांड झालं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
सत्य ऐकल्यावर त्यांची मानसिक स्थिती बिघडते. खोटारड्यांचे हे राज्य आहे. सत्य ऐकण्याची त्यांची मनस्थिती नाही. राज्याचा कारभार हा वेड्यांच्या हाती आहे. हे लोक सत्तेसाठी वेडे झालेले आहेत. उद्या हे लोक महात्मा गांधींनाही वेडे ठरवतील. ज्येष्ठ नेत्यांनाही वेडे ठरवतील. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. बात दूर तक जायेगी, असा इशाराच त्यांनी दिला.
यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचं कौतुक केलं. राहुल गांधी यांची लोकप्रियता देशात आणि जगात आहे. 2024मध्ये राहुल गांधी चमत्कार घडवतील. भारत जिंकेल हे सत्य आहे. राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढत आहे. तुम्ही कितीही सूर्यावर थुंका. एक व्यक्ती म्हणजे सूर्य नाही. राजकारणात एकाच वेळी अनेक सूर्य तळपत असतात. त्यामुळे देश घडत असोत, असा टोलाही त्यांनी लगावला.