मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. पण राज्य सरकारच्या या निर्णयाला सर्वसामान्य नागरिक आणि छोटे व्यापारी, व्यावसायिक आदी क्षेत्रातून विरोध होताना पाहायला मिळतोय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फणडवीस, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही मुख्यमंत्र्यांना याबाबत इशारा दिलाय. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही मुख्यमंत्र्यांना एक पत्र देण्यात आलं आहे. त्यात ‘आठवड्यातून किमान ३ दिवस दुकानं चालू ठेवण्यासाठी व्यापारी वर्गास परवानगी द्यावी’, अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी हे पत्र लिहिलं आहे. (Allow traders to keep shops open 3 days a week, MNS demands)
कोरोनाचं सावट परत आपल्या महाराष्ट्रावर आलं आहे आणि त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण 5 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून ब्रेक द चेन या मोहिमे अंतर्गत कठोर नियम आणि निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले. अनेक गोष्टींचा विचार करुनच आपण हे सर्व नियम आणि निर्बंध लावले असतील. पण एकंदरित पाहिलं तर त्यात व्यापारी वर्गाचा अजिबात विचार करण्यात आलेला नाही.
आपण व्यावसायिक उत्पादनांना मंजुरी दिली आहे पण मालाची पुढची शृंखला चालवणारा व्यापारी वर्ग व त्याचा व्यवसाय जर बंद असेल तर त्या तयार मालाचा उठाव आणि विक्री कशी होणार?
आज महाराष्ट्रात अंदाजित 15 लाख व्यापारी आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे कामगार आणि कामगारांचे परिवार जोडलेले आहेत. मागील वर्षाच्या मार्च महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापारी तसे छोटे दुकानदार यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावं लागलं, ही सत्य परिस्थिती आहे. अनेक आर्थिक नुकसान सोसूनही कामगारांचे पगार, वीज बिल, सरकारी कर, सर्वकाही वेळेवर भरुन हा व्यापारीवर्ग देशाच्या उन्नतीमध्ये आपले योगदान देत आहे.
गेल्यावर्षी ज्या वेळेस लॉकडाऊन सर्व देशात लावण्यात आला तेव्हा आपण पाहिलेच असेल की महाराष्ट्रातील सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. पण जेव्हा हाच लॉकडाऊन पुढे 4 ते 5 महिने चालू राहिला तेव्हा त्यांचे कंबरडे मोडले. त्यानंतर हळूहळू व्यवसायासाठी परवानगी मिळाल्यानंतर त्यांना स्थिरस्थावर होण्यासाठी पुझील 4 ते 5 महिनेला लागले आणि अशातच ब्रेक द चेन मोहिमे अंतर्गत आता पुन्हा 5 एप्रिलपासून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील अनेक विभागात व्यापारीवर्ग रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतोय.
देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी महत्वाचा घटक असलेल्या व्यापारी वर्गांनी वेळोवेळी सरकार आणि प्रशासनाच्या प्रत्येक नियमांचं पालन केलं आहे. आपणही त्यांना विश्वासात घेऊन त्यांचा आणि आपल्या राज्याच्या आर्थिक उन्नतीचा विचार करुन राजसाहेबांनी केलेल्या मागणीनुसार आठवड्यातून किमान 3 दिवस दुकाने चालू ठेवण्यास व्यापारी वर्गाला अनुमती द्यावी.
संबंधित बातम्या :
Allow traders to keep shops open 3 days a week, MNS demands