Maharashtra Lockdown : मुख्यमंत्र्यांनी बाह्या सरसावल्या, फडणवीस, राज ठाकरेंसह सर्वपक्षीयांना पुन्हा बोलावलं, कडक लॉकडाऊनची शक्यता

| Updated on: Apr 09, 2021 | 4:25 PM

राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत उद्या दुपारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

Maharashtra Lockdown : मुख्यमंत्र्यांनी बाह्या सरसावल्या, फडणवीस, राज ठाकरेंसह सर्वपक्षीयांना पुन्हा बोलावलं, कडक लॉकडाऊनची शक्यता
उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच असल्यामुळे राज्य सरकारकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत उद्या दुपारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. कडक निर्बंध लादूनही परिस्थिती बदलत नसल्याचं चित्र राज्यात पाहायला मिळतंय. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढील उपाययोजनांबाबात उद्या पुन्हा चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे सरकार आता राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळतेय. (Possibility of complete lockdown in Maharashtra, CM called an all-party meeting)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या जी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, त्या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित असणार आहेत.

विजय वडेट्टीवारांचे संकेत

“राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता तीन आठवड्यांच्या लॉकडाऊनबाबत चर्चा होणार आहे. सध्याची रुग्णसंख्या ही पाच लाख आहे. पुढच्या काही दिवसात ही संख्या दहा लाखांवर गेली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. त्यामुळे लॉकडाऊनबाबत चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत विरोधी पक्षाचं मत घेतलं जाईल”, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

MPSC परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पुर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

राज्यातील कोरोना स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा  एमपीएससी मार्फत नव्याने घोषित केल्या जातील असे ही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.  ते पुढे म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत  असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि विद्यार्थी आणि विविध राजकीय पक्षांचे यासंदर्भातील  मत आणि मागण्या विचारात घेऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Weekend Lockdown | वीकेंड लॉकडाऊनचं काऊंटडाऊन सुरू; वाचा, संपूर्ण नियमावली काय?

Video: नाशिकमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची परवड, व्हेंटिलेटर बेडसाठी हेळसांड सुरु

Possibility of complete lockdown in Maharashtra, CM called an all-party meeting