मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या संभाव्य निर्णयाविरोधात मुंबईतील व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा बंडाचा झेंडा फडकावला आहे. राज्यात लॉकडाऊन करायचा असेल तर सरकार दुकानदार आणि व्यापाऱ्यांना (Traders) काय पॅकेज देणार, याबाबत घोषणा करावी. अन्यथा आम्ही लॉकडाऊनला जुमानणार नाही, असा इशारा फेडरेशन ऑफ रिटेल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी दिला आहे. (If lockdown happens then stop online delivery also demand by traders association in Mumbai)
जर राज्यातील दुकानं बंद राहणार असतील तर ऑनलाईन डिलिव्हरीही बंद ठेवा. ही सेवा सुरु राहिली तर आम्ही त्याला विरोध करु, असेही विरेन शाहा यांनी म्हटले. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी राज्यात कोरोनाला आवर घालायचा असेल तर लॉकडाऊन अपरिहार्य असल्याचे म्हटले होते. मात्र, भाजपने पूर्ण लॉकडाऊनला विरोध दर्शविला होता. लॉकडाऊन करायचा असेल राज्य सरकारने व्यापाऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. त्यासाठी सरकारच्या डोक्यावर कर्ज झाले तरी चालेल, अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती.
तर दुसरीकडे साताऱ्यात भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनीही लॉकडाऊनविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. कोणत्याही परिस्थितीत आम्ही लॉकडाऊन लागू करून देणार नाही. त्यामुळे मारामारी किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्यासाठी प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला होता.
कोरोनाचा प्रादुर्भाव किती दिवस असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे व्यवस्था तत्काळ उभ्या कराव्या लागतील. जनतेची, व्यापाऱ्यांची भावना लक्षात घ्यायला हवी. त्यांचं मागील वर्ष वाया गेले. कर, वीज बिल, कर्जाचे हप्ते भरावे लागले. त्यामुळे जीवन जगायचं कसं असा प्रश्न जनतेसमोर आहे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठक मांडलं आहे. त्याचबरोबर कोरोना रिपोर्ट्स तात्काळ कसे मिळतील हे पाहावं लागेल. रेमडेसिव्हीर कसं उपलब्ध होतील हे पाहिलं पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.
संबंधित बातम्या:
मद्यप्रेमींना मुंबई महापालिकेचा दिलासा, घरपोच दारु मिळणार, पाहा काय आहेत नियम
Maharashtra Lockdown : फडणवीस म्हणाले, लॉकडाऊनमुळे उद्रेक होईल, पंकजा मुंडे म्हणतात, पर्याय काय?
(If lockdown happens then stop online delivery also demand by traders association in Mumbai)