राज्याच्या सत्तानाट्यात नाराजीच्या अंकाचा प्रवेश झाला आहे. दिल्ली दरबारी झालेल्या बैठकीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यात परतले. ते थेट त्यांच्या महाबळेश्वर जवळील दरे या गावात पोहचले. दोन दिवसांपासून ते दरे गावात मुक्कामी आहेत. त्यातच त्यांची तब्येत ठीक नसल्याची बातमी येऊन धडकली. काळजीपोटी काही जण त्यांना भेटायला पोहचले. पण त्यांना त्यांनी भेट नाकारली. या सर्व घडामोडींमुळे पडद्यामागे काय घडत आहे, याची चर्चा राज्यात सुरू आहे. या नाराजी नाट्यावर पडदा पडेपर्यंत सर्वांचेच देव पाण्यात असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत जल्लोष करणाऱ्या महायुतीत इतक्या मोठ्या महायशानंतर सुद्धा शांतता पसरली आहे. नाराजी नाट्याने मात्र राज्यात देवाचा धावा वाढला हे नक्की.
अनेकांची दरे गावाकडे धाव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांना भेट न घेताच परतावे लागले, तब्येत ठीक नसल्याचं कारण त्यासाठी देण्यात आलं. दरे गावात मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी पोहोचले होते, मात्र काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना गेटवरूनच परतावे लागले.
दरे गावातील निवासस्थानी मुख्यमंत्री विश्रांती घेत असून, भेटीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांनाही प्रवेश नाकारला जात आहे. जळगाव पाचोडचे आमदार कपिल पाटीलही भेटीसाठी पोहोचले होते, मात्र त्यांनाही नकार देण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी गावी आहेत. तर निकटवर्तीय संजय मोरे यांच्याकडून भेटीसाठी आलेल्या आमदार आणि कार्यकर्त्यांकडून संपर्क केला जात आहे.
केसरकरांचा देवाकडे धावा
मंत्री पदासाठी वर्णी लागावी म्हणून अनेक जण इच्छुक आहे. राज्यात लवकरच सत्ता स्थापन होणार असल्याचा थेट संदेश भाजपाने दिला. भाजपाच्या नियमानुसार आता पुढील प्रक्रिया पार पडेल. दिल्लीतून पक्ष निरीक्षक येतील आणि ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करतील. दरम्यान मंत्री पदी आपली वर्णी लागावी यासाठी अनेक नेत्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. त्यासाठी लॉबिंग करण्यात येत आहे. दरे गावात शिंदे यांनी भेट नाकारल्यानंतर दीपक केसरकर यांनी देवाकडे धावा केला. आज सकाळी ८ वाजता वज्रेश्वरी देवीच्या दर्शनासाठी ते मुंबईहून रवाना झाले.
तर मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मंत्रीपदासाठी नाशिकमध्ये देवीला अभिषेक करण्यात आला. टायगर ग्रुपच्या वतीने सप्तशृंगी गडावर अभिषेक करण्यात आला. शिवभक्त अनिकेत घुले आणि टायगर ग्रुपचे सचिन जाधव यांच्यातर्फे अभिषेक करण्यात आला. सुनील शेळके सलग दुसऱ्यांदा विजयी झाल्याने त्यांची मंत्री पदावर वर्णी लागावी यासाठी देवाला साकडे घालण्यात आले.
एकनाथ शिंदे आज मुंबईत
गेल्या दोन दिवसांपासून आपल्या दरे गावमध्ये आराम करायला गेलेले महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईमध्ये परतणार आहेत. मुंबईत आल्यानंतर काही महत्त्वाच्या नेत्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत राज्यात आज संध्याकाळी महायुतीची महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.