महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दमदार कामगिरी केली. महायुती बहुमताच्या लाटेवर स्वार झाली. आज महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडत आहे. महायुतीचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आज शपथ घेतील. या सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींसाठी अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले आहे. तरीही इतर मंत्री पदावर एकमत झाले नसल्याने आज केवळ तिघांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुतीच्या या त्रिमूर्तींकडे किती संपत्ती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तीन शिलेदारांची किती आहे संपत्ती? त्यांच्याकडे किती आहे श्रीमंती?
एकनाथ शिंदे हे किती संपत्तीचे धनी?
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाचपाखडी या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यांनी त्यावेळी निवडणूक अर्जासोबत प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानुसार, त्यांच्या संपत्तीत गेल्या पंचवार्षिकपेक्षा वाढ झाली. 2019 मध्ये त्यांची संपत्ती 11 कोटी रुपये इतकी होती. यावेळी त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रानुसार, शिंदे यांच्याकडे 37 कोटी 68 लाख 58 हजार 150 रुपये इतकी संपत्ती आहे. गेल्या पंचवार्षिकपेक्षा त्यांच्या संपत्तीत 26 कोटी 11 लाख 85 हजार रुपयांची वाढ झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर 5 कोटी 29 लाख 23 हजार 410 रुपयांचे कर्ज आहे. तर त्यांच्या पत्नीवर 9 कोटी 99 लाख 65 हजार 988 रुपयांचं कर्ज आहे.
अजितदादांची संपत्ती किती?
अजित पवार यांनी निवडणूक आयोगांकडे या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल केली. त्यासाठी त्यांनी शपथपत्र दाखल केले. त्यांच्याकडे एकूम 7 लाख 20 हजारांची रोख रक्कम आहे. तर पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे 6 लाख 65 हजार 400 रुपये रोख आहेत. त्यांच्याकडे बँकेत 3 कोटी 9 लाख 69 हजार 400 रुपयांची ठेव तर पत्नीच्या नावे 3 कोटी 69 लाख 92 हजार 91 रुपयांच्या ठेवी आहेत. अजितदादांकडे 24 लाख 79 हजार 760 रुपयांचे बाँड्स आहेत. तर पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे 14 लाख 99 हजार 610 रुपयांचे बाँड्स आहेत.
अजित पवार यांनी टपाल खात्यात बचत आणि विम्यापोटी 10 कोटी 79 लाख 2155 रुपयांची गुंतवणूक केली आहे. तर पत्नीच्या नावे त्यांनी 44 लाख 29 हजार 463 रुपये गुंतवणूक केली आहे. त्यांच्याकडे विविध कंपन्यांचे एकूण 8 कोटी 50 लाख रुपयांचे शेअर्स आहेत. त्यांच्याकडे कार, ट्रॅक्टर आणि ट्रेलर्स सुद्धा आहे.
देवाभाऊंची संपत्ती किती?
देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला. फडणवीस यांनी निवडणुकीत शपथपत्र दाखल केले. त्यानुसार फडणवीस कुटुंबाकडे 13 कोटींची संपत्ती आहे. त्यांच्याकडे 13 कोटी 27 लाख 47 हजार 728 रुपये इतकी संपत्ती आहे. फडणवीसांच्या आयटी रिटर्न फॉर्मनुसार 2023-24 मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न 79 लाख 30 हजार 402 रुपये इतके आहे. तर 2022-2023 मध्ये हा आकडा 92 लाख 48 हजार 094 रुपये इतके होते. फडणवीस यांनी पत्नी अमृता यांची संपत्ती 6 कोटी 96 लाख 92 हजार 748 रुपये तर मुलीची संपत्ती 10 लाख 22 हजार 113 रुपये असल्याचे आकडेवारी सांगते.
फडणवीस यांच्या बँक खात्यात 2 लाख 28 हजार 760 रुपये आहेत. तर त्यांच्या पत्नीकडे 1 लाख 43 हजार 717 रुपये आहेत. फडणवीसांनी राष्ट्रीय बचत योजना, डाक बचत, विमा यात 20 लाख 70 हजार 607 रुपये गुंतवले आहेत. त्यांची पत्नी अमृता यांनी शेअर, म्यूचल फंड आदी मध्ये मिळून 5 कोटी 62 लाख 59 हजार 031 रुपये गुंतवणूक केली आहे. फडणवीस यांच्या NSS-बचत खात्यात 17 लाख रुपये जमा आहेत. तर एलआयसीमध्ये 3 लाखांची गुंतवणूक आहे. फडणवीस यांच्याकडे एकही कार नाही.