मुंबई : शिवसेना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी आयकर विभागाकडून सुरु असलेली मॅरेथॉन चौकशी अखेर संपली. तब्बल चार दिवसांनंतर या चौकशीला ब्रेक लागला आहे. शुक्रवार सकाळपासून इन्कम टॅक्स विभागाचे (Income Tax Raid) अधिकारी जाधव यांच्या घरी तळ ठोकून होते. चौथ्या दिवशी, जवळपास 75 तासांनंतर अधिकारी निघाल्याची माहिती आहे. आतापर्यंत 33 ठिकाणच्या झाडाझडतीत एकूण 2 कोटींच्या रकमेसह महत्त्वपूर्ण कागदपत्रे अधिकाऱ्यांनी जप्त केली असल्याची माहिती समोर आली आहे. यशवंत जाधव यांच्यावरील कारवाईवरुन राजकारणही तापलं होतं. केंद्र सरकार सूड भावनेने ही कारवाई करत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केला होता.
शिवसेना नेते आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी इन्कम टॅक्स अधिकारी सीआरपीएफ जवानांसह शुक्रवारी सकाळीच दाखल झाले होते. मुंबईतील माझगाव भागात असलेल्या त्यांच्या घरातच यशवंत जाधव यांची चौकशी सुरु होती. यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव या मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर आमदार आहेत.
यशवंत जाधव यांच्याकडे पाच वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची धुरा आहे. जाधवांनी बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे. यशवंत जाधव यांच्यावर 15 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ही रक्कम त्यांनी यूएईला हलवल्याचं बोललं जात आहे.
आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी यशवंत जाधव यांना नोटीस पाठवली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जाधवांवर घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यांनी ईडी- आयकर विभागाला तक्रार केल्यानंतर यशवंत जाधव यांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र तिला समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे.
संबंधित बातम्या :
Yashwant Jadhav: कोण आहेत शिवसेनेचे यशवंत जाधव, जे आयटीच्या रडारवर आलेले आहेत?