मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरात असलेल्या मॉलमध्ये नुकत्याच लागलेल्या आगीच्या (Bhandup Mall Fire) घटनेत एका कुत्र्याला प्राण गमवावे (Dog Death) लागले. हा श्वान बंडू नावाने परिसरातील नागरिकांमध्ये ओळखला जात होता. पेटत्या इमारतीत शिरलेल्या मॉलच्या सुरक्षा रक्षकांच्या मागोमाग तोही निष्ठेने गेला होता. मात्र धुरामुळे घुसमटून बंडूचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास बंडूचा मृतदेह सापडला. त्याला मॉल कॉम्प्लेक्समध्येच दफन करण्यात आले आहे. मॉलच्या परिसरात सहा वर्षांपासून राहत असलेल्या बंडूला मॉलमधील अनेक दुकान मालकांनी श्रद्धांजली वाहिली.
शुक्रवारी संध्याकाळी आग भडकली, तेव्हा बंडू मॉलमध्ये शिरताना अखेरचा दिसला होता, अशी माहिती मॉलमधील एका दुकानाच्या मालकीण लता अमिन यांनी दिल्याचं वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलं आहे. मॉलचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या सुरक्षा गटाचा आपणही एक भाग आहोत, असं बंडू मानत असावा. त्यामुळे आग लागल्यावर आत गेलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मागोमाग तोही आत गेता. मात्र धुरामुळे त्याचे भान हरपले असावे. शनिवारी सकाळी तो जिन्याच्या खाली असलेल्या मोकळ्या जागेत मृतावस्थेत आढळला. त्याच्या निधनाने आम्ही सगळेच अत्यंत दु:खी झाले आहोत, असं लता अमीन म्हणाल्या.
“माझ्यासह अनेक दुकानदार मॉलमध्ये बंडू आणि बाळू नावाच्या दुसऱ्या कुत्र्याला खायला घालायचे. बंडू हा अतिशय हुशार आणि संवेदनशील कुत्रा होता. गेल्या वर्षी मॉलमधील एका नर्सिंग होममध्ये लागलेल्या आगीच्या वेळीही बंडूने मोठमोठ्याने भुंकला होता, कारण त्याला माहिती होतं की आगीत काही जण अडकले आहेत. त्या भीषण आगीनंतर बंडू आणि बाळू दोघांनीही काही दिवस नीट खाल्लेही नव्हते” असंही लता यांनी सांगितलं.
“मॉल बंद झाल्यावर आमचे व्यावसायिक नुकसान झाले आहेच, मात्र बंडूला गमावल्याने आमचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. व्यवसाय पुन्हा उभारता येईल, पण आम्ही आमच्या बंडूला परत कसे आणू?” असं मॉलमधील आणखी एका दुकानाच्या मालकाने सांगितले
संबंधित बातम्या :
भांडुपच्या ड्रीम मॉलमध्ये पुन्हा एकदा अग्नीतांडव, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही