मुंबई : राज्यात गुढीपाडव्याची धामधूम सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आजच्या सभेकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. त्यामुळे राज ठाकरे आज आपली तोफ कुणावर डागणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याआधी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी बोलताना शिवसेनेचा उल्लेख केला नसला तरी जुन्या पक्षाची धुरा राज ठाकरे यांच्याकडे दिली असती तर आज शिवसेनेचे राज्यात वेगळे चित्र असते असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर टीका करताना त्यांनी ते फेल गेल्याचेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 17 वर्षाचा प्रवास सांगताना बाळा नांदगावकर यांनी युतीच्या प्रश्नावरूनही उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
यावेळी ते म्हणाले की, जुन्या पक्षाची म्हणजेच शिवसेनेची धुरा जर राज ठाकरे यांच्याकडे दिली असती तर राज्यात काय घडलं असतं आणि आजच शिवसेनेचं चित्रही वेगळं असतं असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
यावेळी बाळा नांदगावकर यांनी बोलताना राज ठाकरे हे अत्यंत प्रामाणिकपणे, अभ्यासपूर्ण मांडणी करूनच ते कोणत्याही विषयाचा ते फडशा पाडतात असंही त्यांनी यावेळी सांगितले.
शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना बाळा नांदगावकर यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांना आता दुर्देवाने इतर लोकं चालतात मात्र राज ठाकरे चालत नाहीत असं नाव न घेता त्यांनी त्यांना टोला लगावला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांना जेलमध्ये पाठवणारे, टी बाळू बोलणारे, टीपू सुलतानाचे तळी उचलणारे, अस्लम शेख, नसीम खानसारखी माणसं,दाऊदशी संबंध असलेले नबाब मलिक, कौन बाळासाहेब असं विचारणारे कोणीही यांना चालतात मात्र राज ठाकरे चालत नाहीत अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या काळातील शिवसेनेवर केली आहे.
मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता असताना तुम्ही काय प्रगती केली. तुमच्या काळात नारायण राणे, एकनाथ शिंदे आणि 40 आमदार आणि 13 खासदार तुम्हाला सोडून गेले आहेत. त्यामुळे तुमचं नेतृत्व निष्फळ ठरलेलं असल्याचा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केले.