महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागतोय. महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिलेला आहे. सर्वाधिक जागांवर भाजप आघाडीवर दिसत आहे. अशात महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? याची चर्चा होत आहे. भाजपचे नेते प्रविण दरेकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला मोठं यश दिलेलं आहे. आम्हाला यशाची खात्री होती. पण इतकं यश मिळेल असं वाटलं नव्हतं. लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. महाराष्ट्राचे आभार… महायुतीचं सरकार येत आहे. ज्यांचे जास्त उमेदवार जिंकणार, त्याांना जास्त संधी असते. भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत, असं दरेकर म्हणाले.
प्रविण दरेकरांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांचं विमान आता जमीनीवर लँड करण्याची आवश्यकता आहे. केवळ शिवीगाळ करून विजय मिळत नाही. ग्राऊंड रिअॅलिटी समजायला हवी. जनतेने विकासाच्या बाजूने मतदान केलं आहे. जे धर्म युद्ध देवेंद्र फडणवीस यांनी पुकारलं होतं. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आम्ही सगळे एक आहोतचा नारा जनतेने मान्य केला. केंद्रात भाजपचं सरकार आहे. अशात राज्यातही जर महायुतीचं सरकार आलं तर राज्याचा विकास होऊ शकतो, असं लोकांना वाटलं. त्यामुळे जनतेने हा कौल दिलेला आहे, असं प्रविण दरेकर म्हणालेत.
विरोधक वारंवार टीका करायचे. द्वेष मत्सर करायचे पण मतदारांनी शांतपणे मतदान केलेलं आहे. लोकसभेत झालेली चूक आता दुरुस्त केलेली आहे. लोकसभेला चूक केल्याची खंत लोकांच्या मनात होती. लोकसभेला नरेंद्र मोदी यांना पाठबळ देण्यात आपण मागे पडल्याचं लोकांच्या लक्षात आलं, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत. मागच्या अडीच वर्षांमध्ये महायुती सरकारने जे काम केलं. त्याला लोकांनी पाठिंबा दिला आहे. लोकांच्या कल्याणाचं काम केलं. विकास केला. त्यामुळे केवळ शिव्या देणाऱ्या लोकांच्या मागे जनता गेली नाही, असं प्रविण दरेकरांनी म्हटलं आहे.