मुंबई : महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्यावतीने मुंबईमध्ये उद्या (9 फेब्रुवारी) आंतरराष्ट्रीय दौडचे (महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉन) आयोजन केले (Mumbai police marathon) आहे. शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व जनतेपर्यंत पाहोचविण्याचा उद्देश या मॅरेथॉनमागे असून समाजातील सर्व घटकांनी या दौडमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी केले (Mumbai police marathon) आहे.
ही मॅरेथॉन सकाळी 5 ते 9 या वेळेत होणार आहे. ‘तंदुरुस्त भारत-फिट इंडिया’ या चळवळीद्वारे पोलीस आणि सर्वसामान्य नागरीक यांच्यात शारिरीक तंदुरुस्तीची जाणीव निर्माण व्हावी, यासाठी अखिल भारतीय पोलीस महासंचालकांच्या परिषदेमध्ये ठराव करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्रात या आंतरराष्ट्रीय दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडचे नियोजन विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश करीत आहेत.
42 किलोमीटरची फूल मॅरेथॉन, 21 कि.मी.ची हाफ मॅरेथॉन, 10 मैल किंवा 16 कि.मी. दौड आणि 5 किलोमीटरची टाईम रन अशा चार प्रकारांमध्ये या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. फुल मॅरेथॉन ही गेट वे ऑफ इंडिया ते राजीव गांधी सागरी सेतू आणि परत अशी असणार आहे. हाफ मॅरेथॉन ही राजीव गांधी सोगरी सेतू येथून सुरू होऊन गेट वे ऑफ इंडिया येथे समाप्त होईल. 10 मैलांची दौड राजीव गांधी सागरी सेतू ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत तर टाईम रन गेट वे ऑफ इंडिया ते एन.सी.पी.ए. पर्यंत असणार आहे.
या दौडच्या मार्गावर महाराष्ट्र पोलीसांद्वारे ‘सजग आणि समर्थ’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य दौडचा भाग म्हणून 31 जानेवारी रोजी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दौडचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र पोलीसांच्या नेतृत्वाखाली 31 जानेवारी रोजी मिडनाईट इव्हेथॉनचेही आयोजन केले होते. यामध्ये महिला पोलीस अंमलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीसह 1 हजार 200 पेक्षा अधिक टायग्रेस मॉम्सनी सहभाग घेतला होता. पोलीस महासंचालक यांच्या पत्नी श्रीमती नॅन्सी सुबोध जयस्वाल यांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
नुकतेच 2 फेब्रुवारी रोजी ‘राईड टु राईझ’ या सायकलिंगचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 500 सायकलपटुंनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे यातील 10 जण अंध होते. प्रदूषणमुक्त समाज, युवकांशी संवाद तसेच स्वस्थ भारत अभियानाला चालना देणे हा त्याचा उद्देश होता.
मुंबईत उद्या होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांना 2 हजार फिजीओथेरेपिस्ट, 300 होमिओपॅथी आणि आहारतज्ज्ञ मोफत सल्ला आणि उपचारासाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत, अशीही माहिती पत्रकात देण्यात आली आहे.