मुंबई : आजपासून पुढचे तीन दिवस राज्यातील वेगवेगळ्या भागात पावसाची शक्यता (Maharashtra Rain Update) आहे. यामुळे वाढलेल्या तापमानापासून दिलासा मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचं आहे. आजपासून 13 मे पर्यंत राज्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस (Rain Expected) होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे लोक अधिकच घामाघूम झाले आहेत. वाढलेल्या तापमानाचा फटका सगळ्यांना बसतोय. अशातच विदर्भात उष्णतेची लाट (Heat Wave) येईल असा इशारा हवामान विभागानं आधीच दिलेला होता. आज उद्या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तापमान अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचं आवाहनंही केलं जातंय. तर दुसरीकडे गोव्यासह कोकण किनारपट्टी आणि मुंबईतही वातावरण कोरडं होतं. आज कोकण, गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
मुंबईत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तापमान वाढलंय. तर दुसरीकडे मराठवाड्यासह विदर्भातही काही ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली आहे. तर हवामान विभागाकडून गेल्या चार दिवसांपासून असानी चक्रीवादळाबाबत अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नवी मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण पहायला मिळतंय. त्यामुळे पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असानी चक्रीवादळामुळे यंत्रणाही सतर्क आहेत. या वादळाचा महाराष्ट्राला फटका बसण्याची कोणतीही शक्यता वर्तवण्यात आलेली नाही. मात्र या वादळामुळे बंगालच्या बहुतांश भागात वेगानं वारे वाहून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर बंगालमध्ये या वादळाचे परिणाम जाणवतील, अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसंच महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं वर्तवली जातेय.