लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर त्यांनी विधानसभेत रणनीती बदलवली. मनसे विधानसभेच्या रणसंग्रामात हिरारीने उतरली. राज्यभरात मनसेने उमेदवार उभे केले. राज ठाकरे यांनी निवडणूक प्रचारात मनसे शिवाय महायुतीचे, विशेषतः भाजपाला सत्तेचा मार्ग सुकर होणार नाही, असा दावा केला होता. आता एक्झिट पोलमध्ये राज ठाकरे हे खरंच किंगमेकर होतील का? मनसेचे इंजिन विधानसभेच्या रुळावर वेगाने धावलं का? काय सांगते आकडेवारी?
मनसे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत?
मनसेने राज्यात, विधानसभेच्या 128 जागांवर उमेदवार उभे केले होते. मनसे मुंबईत मोठी खेळी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीतील काही उमेदवारांना मनसे डोकेदुखी ठरण्याची शक्यता होती. तर एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी यावेळी भाजपाचा मुख्यमंत्री होईल तर 2029 मध्ये मनसेचा मुख्यमंत्री असेल असा दावा केला होता. आता विविध संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये मनसेविषयी काय भाकीत केले ते समोर आले आहे.
मनसे इतर श्रेणीत
दरम्यान विविध संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलमध्ये मनसेला स्वतंत्र स्थान देण्यात आले नसल्याचे दिसून येते. या विविध अंदाजांमध्ये मनसेला इतर श्रेणीत टाकण्यात आले आहे. इलेक्ट्रोरल एजच्या एक्झिट पोलमध्ये मनसे आणि इतर पक्षांना 20 जागांवर पुढे दिसते. तर दैनिक भास्करच्या एक्झिट पोलमध्ये मनसेला 2 ते 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. पोला डायरीमध्ये मनसे, वंचित, एमआयएमसह अपक्षांच्या पारड्यात 12-29 जागा देण्यात आल्या आहेत. मनसेला एक्झिट पोलमध्ये स्वतंत्र स्थान न देण्यात आल्याने मनसेच्या खात्यात किती जागा येतील याचा थेट अंदाज दिसून येत नाही.
किंगमेकर ठरतील?
23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येईल. यात मुंबईतील मराठी पट्ट्यात दोन शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेससह मनसेच्या पारड्यात किती जागा येतील हे स्पष्ट होईल. पण एक्झिट पोलमध्ये मनसेला प्रमुख पक्ष म्हणून गृहीत धरण्यात आलेले नाही. त्यामुळे मनसे किंगमेकर ठरणार का? भाजपाला मनसेच्या पाठिंब्याची गरज असेल का? या प्रश्नांची उत्तरं दोन दिवसानंतर मिळेल.