महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पूर्ण ताकदीनिशी उतरली आहे. राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले आहेत. यापूर्वी आदित्य ठाकरे थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. आता ठाकरे कुटुंबात अमित ठाकरे नशीब आजमावत आहेत. माहिममध्ये महायुतीने उमेदवार द्यावा की नाही याविषयी राज ठाकरे यांनी रोखठोक मत मांडलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अनेक विषयांवर त्यांची मतं मांडली.
खास ठाकरी फटकारे
सध्याच्या राजकीय घडामोडींवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी त्यांचे मत मांडले. आम्ही थेट राजकारण करतो. त्यासाठी भलेही वेळ लागतो. राजकारणात तिरकी चाल खेळणाऱ्यांना काही पदं पदरात पाडून घेता येतात. पण अशी राजकीय पोळी जास्त काळ शेकता येत नाही असे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही लोकांना जोडत जाऊ आणि सत्ता आणू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीविषयीचा किस्सा
राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे माहिम मतदार संघातून (Mahim Constituency) उभा आहे. पक्षाने याविषयीचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीविषयीचा किस्सा सांगितला. पाच वर्षांपूर्वी आदित्य जेव्हा वरळी मतदारसंघातून उभा होता. या भागात माझं 38-39 हजार मतदान आहे. मी निश्चित केले उमेदवार देणार नाही. मी कोणाशीच याविषयी चर्चा केली नाही की, काही अपेक्षा ठेवली, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप-शिंदे सेनेला रोखठोक
माझा मुलगा यावेळी निवडणुकीत उभा आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे अनेक वर्षांपासून चांगले संबंध आहेत. माझा मुलगा या ठिकाणी उमेदवार आहे. चांगल्या हेतूने त्यांना उमेदवार द्यायचे नसतील, तर ते नाही देणार उमेदवार, त्यांना उमेदवार द्यायचा असेल तर त्यांनी द्यावा. मी कोणती ही मागणी करणार नाही. जर ते पाच वर्षानंतर उमेदवार उभा करणार असतील तर त्यांनी तो आताच द्यावा, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
शिंदे यांची तयारी, पण सरवणकरांची उमेदवारी
माहिम विधानसभा मतदारसंघातून सध्या सदा सरवणकर आमदार आहेत. ते एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिंदे यांनी सरवणकर यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगितले. पण सरवणकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीचा सामना होणार हे नक्की आहे.