Voter ID विसरलात? चिंता कशाला करता, या ओळखपत्रांआधारे करा की मतदान, कोणी नाही थांबवणार

| Updated on: Nov 20, 2024 | 7:39 AM

Voter ID : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा दिवस अखेर उजाडला आहे. पण अनेकदा गडबडीत आपण ओळखपत्र ठेवता एका ठिकाणी, शोधतो एका ठिकाणी, ते वेळेत सापडले नाहीतर अशावेळी मतदान करायला जावं कसं असा प्रश्न अनेकांना पडतो. Voter ID नसले तरी या 12 ओळखपत्रांआधारे तुम्ही मतदानाचा हक्क बजावू शकता.

Voter ID विसरलात? चिंता कशाला करता, या ओळखपत्रांआधारे करा की मतदान, कोणी नाही थांबवणार
मतदान करा
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज, 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होत आहे. यावेळी महाविकास आघाडी, महायुती, तिसरी आघाडी, वंचित, बंडखोर, अपक्ष अशांमध्ये लढत पाहायला मिळत आहे. तुमच्या मनातील कौल आज मतपेटीत बंद होणार आहे. पण मतदानाच्या दिवशी नेमकं मतदान कार्ड गायब होतं. ते ठेवलेले असते एकीकडे आणि आपण शोधतो दुसरीकडे. मतदान ओळखपत्र सापडले नाही तर मतदान कसे करणार असा प्रश्न काहींना पडतो. तेव्हा काळजी करायची गरज नाही. या 12 ओळखपत्रांआधारे तुम्ही मतदानाचा हक्क बजावू शकता.

या 12 पैकी हवा एक पुरावा

मतदान ओळखपत्र जवळ नसल्यास कोणताही एक मूळ पुरावा तुम्हाला मतदान केंद्रावर दाखवावा लागेल. त्यावेळी संबंधितांना मतदानाचा हक्क बजावता येईल. पण मतदारांना मतदान केंद्रावर मोबाईल नेता येणार नाही. त्यांना मोबाईलमधील ओळखपत्र दाखवता येणार नाही.

हे सुद्धा वाचा

मतदाराची ओळख पटवण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरावा लागणार आहे. आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, टपाल खात्याचे पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचे स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र-पासपोर्ट, निवृत्ती वेतन कागदपत्र, सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा ओळखपत्र, खासदार, आमदारांना देण्यात आलेले ओळखपत्र, दिव्यांगाना देण्यात आलेले ओळखपत्र या आधारे मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येईल.

नो मोबाईल प्लीज

मतदान करताना व्हिडिओ काढणे, छायाचित्र काढण्याचा अनेकांचा मोह होतो. पण विधानसभा निवडणुकीच्या मतदानावेळी मोबाईलचा वापर करता येणार नाही. मतदान केंद्राच्या 100 मीटर परीसरात तर मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी आहे. मतदानावेळी मतदान केंद्रात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. मतदानाची गोपनियता भंग होऊ नये यासाठी मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी आहे. याविषयीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित मतदारावर भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई करण्यात येईल.

त्यामुळे राष्ट्रीय कर्तव्य बजावताना गोपनियतेचा भंग होणार नाही. आयोगाच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या. नसता तुमचा सोशल मीडियावरील उत्साह तुम्हाला महागात पडेल. मतदान करताना ओळखपत्र सोबत न्यावे लागेल. मतदान ओळखपत्र नसले तरी इतर उल्लेखित ओळखपत्रांपैकी एक तरी तुमच्या जवळ असणे अनिवार्य आहे.