महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस अगोदर राज्यात अनेक ठिकाणी पैसे वाटपाच्या घटनांचा आरोप झाला. तर काही ठिकाणी उमेदवारांवर हल्ले झाले. कार्यकर्ते भिडले. तर आजही मतदानाच्या दिवशी काही ठिकाणी वाद झाला. काही ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याची तक्रार झाली. तर शिर्डी मतदारसंघात विद्यार्थ्यांकडून मतदान होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर राज्यातील इतर पण काही मतदारसंघात उमेदवारांनी मतदारांना वाहनातून आणण्यावर आक्षेप घेतला आहे.
शिर्डीत विद्यार्थ्यांच्या मतदानावरून वाद
शिर्डी विधानसभेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी मतदान केले. लोणी येथे महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मतदान करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शिर्डी विधानसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांनी हा व्हिडीओ व्हायरल केला आहे.
विद्यार्थ्यांकडे मतदार ओळखपत्र देखील आढळले आहेत. त्यावर घोगरे यांनी आक्षेप नोंदवला आहे. हे महाविद्यालयीन विद्यार्थी परराज्यातील आहेत आणि ते लोणी येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. शिर्डी विधानसभेत काँग्रेसच्या प्रभावती घोगरे तर भाजपकडुन राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात लढत होत आहे. निवडणूक आयोगाकडे याविषयीची तक्रार केल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
राहुल नार्वेकर आक्रमक
ज्येष्ठ नागरिकांना मतदान न करताच परत पाठवण्यात येत असल्याचा आरोप राहुल नार्वेकर यांनी केला आहे. वृद्धांना मतदान करण्यासाठी सोय नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांना यासंबंधी फोन केला आणि त्यांच्याकडे याविषयीची तक्रार केली. वृद्धांना मतदान न करता परत पाठवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
सुहास कांदे-समीर भुजबळ यांच्यात वाद
दरम्यान सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यात मोठा वाद झाला. कांदे यांनी वाहनातून बोलवलेल्या मतदारांना समीर भुजबळ यांनी आडवले. नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार उघड झाला. यावेळी दोन्ही गटात जोरदार राडा दिसून आला. यावेळी दोन्ही गटाचे समर्थक आमने-सामने आले. दोघांमध्ये धुमश्चक्री उडाली. समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली. त्यानंतर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला.