RSS : भाजपाच्या विजयाचा कोण इंजिनिअर; महायुतीच्या बंपर विजयाचा कोण सूत्रधार? संघाचे अतुल लिमये आहेत तरी कोण?

| Updated on: Nov 24, 2024 | 12:09 PM

BJP-RSS Atul Limaye : भाजपाच्याच नाही तर महायुतीच्या ऐतिहासिक विजयामागे एक नाव सातत्याने पुढे येत आहे. ते आहे अतुल लिमये यांचं. महायुतीच्या बंपर विजयाचे ते शिल्पकार आणि सूत्रधार मानण्यात येत आहेत. संघाने काही दिवसांपूर्वीच त्यांची वरिष्ठ पदावर वर्णी लावली होती. ते संघाचे संयुक्त महासचिव आहेत.

RSS : भाजपाच्या विजयाचा कोण इंजिनिअर; महायुतीच्या बंपर विजयाचा कोण सूत्रधार? संघाचे अतुल लिमये आहेत तरी कोण?
संघाचं सोशल इंजिनिअरिंग
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांनी अभूतपूर्व यश भाजपा आणि महायुतीच्या पारड्यात टाकले. हा जणू एकांगी निकाल होता. महायुतीचे शिलेदार या निवडणुकीत पायाला भिंगरी लावून पळाले. तर या यशात संघाने सिंहाचा वाटा उचलला. महायुतीला 288 जागांपैकी 230 इतक्या विक्रमी जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस-उद्धव ठाकरे सेना आणि शरद पवार गटाच्या महाविकास आघाडीला केवळ 46 जागा मिळाल्या आहेत. त्यात भाजपाला 132 अशा सर्वोच्च जागा मिळाल्या आहेत. त्यापाठोपाठ शिंदे सेनेला 57 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मायक्रो प्लॅनिंग महत्त्वाचं ठरलं. त्यामुळेच ही एकांगी लाट आल्याचा दावा करण्यात येत आहे.

कोण आहेत अतुल लिमये?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव अतुल लिमये हे 54 वर्षांचे आहेत. ते या विजयाचे अभियंता आणि शिल्पकार मानण्यात येत आहेत. त्यांच्या कुशल रणनीती आधारे भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवल्याचा दावा करण्यात येत आहे. लिमये हे नाशिक येथील रहिवाशी आहेत. गेल्या तीन दशकांपासून ते एका आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करत होते. त्यांनी ही नोकरी सोडली आणि पूर्णवेळ ते संघाचे प्रचारक म्हणून काम करू लागले. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संघाने विधानसभा निवडणुकीचे सुक्ष्म नियोजन केलं आणि भाजपाला विजय सुकर झाला.

हे सुद्धा वाचा

सोशल इंजिनिअरिंगने भाजपाचा मार्ग केला सोपा

अतुल लिमये हे एका मोठ्या गटाचे नेतृत्व करतात. या गटात तरुण-तरुणींचा मोठा भरणा असल्याचे समोर येत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक घटकांचे संशोधन, समस्या आणि उपाय यावर भर देण्यात येतो. यामधून थिंक टँक तयार करण्यात येते. मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचे प्रश्न, अडचणी आणि उपाय यावर सुद्धा हा घटक काम करतो. या दोन्ही समाजासाठी काय सरकारी धोरण असावे यावर सुद्धा लिमये यांच्या गटाने काम केले आहे. 2017 मधील मराठा आंदोलन आणि 2018 मधील अर्बन नक्सल या सारख्या सामाजिक मुद्दांना हातळण्यासाठी लिमये यांनी राज्य सरकारला महत्त्वाचे इनपूट दिल्याचे समोर येत आहे.

असा होता संघातील प्रवास

अतुल लिमये हे सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्र, रायगड आणि कोकणात काम करत होते. त्यानंतर त्यांच्या खांद्यावर देवगिरी प्रांतातंर्गत मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली. ते सह प्रांत प्रचारक होते. यावेळी त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सामाजिक-राजकीय घडामोडींचा जवळून अभ्यास केला. त्याचे परिणाम समजून घेतले. पुढे 2014 मध्ये भाजपाच्या काळात त्यांच्यावर पश्चिम महाराष्ट्रासह गुजरात आणि गोवा अशी व्यापक जबाबदारी देण्यात आली. या काळात त्यांनी राजकीय उतरंड, भाजपा नेतृत्व, विरोधकांच्या कमकुवत बाजू याचा अभ्यास केला.