केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या राज्यातील निवडणूक तारखांची आज दुपारी घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यातच महाराष्ट्रात पण निवडणुकांची तारीख घोषीत होण्याची चर्चा रंगली आहे. राज्यात विधानसभेचा कार्यकाळ पाहता निवडणुकीचे पडघम आताच वाजतील का, याविषयी सस्पेन्स वाढला आहे. आज दुपारी 3 वाजता यावरील पडदा उघडेल. पण राजकीय तज्ज्ञांच्या मते आताच राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता कमी आहे.
दुपारी होणार तारखांची घोषणा
विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. विज्ञान भवनात आज दुपारी ३ वाजता विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होऊ शकते. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाच्या टीमने या दोन राज्यांचा दौरा केला होता आणि त्यानंतर 30 सप्टेंबरपूर्वी या दोन्ही राज्यांमध्ये निवडणुका होतील असं सांगण्यात आलं होतं.
या दौऱ्यात आयोगाने विविध बाबींचा अभ्यास केला. अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. विशेषतः जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ले वाढले आहेत. त्यापार्श्वभूमीवर आयोगाने सुरक्षेची पाहणी केल्याचे समजते. निवडणुकीत कोणतेही विघ्न येणार नाही याविषयी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ जानेवारीमध्ये संपणार आहे.
निवडणुकीविषयी सस्पेन्स वाढला
हरियाणा विधानसभेची मुदत 3 नोव्हेंबर 2024 रोजी संपणार आहे. तर महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपणार आहे. सध्या ऑगस्ट महिना सुरु आहे. त्यामुळे तीन महिन्यापूर्वीच आचार संहिता लावण्याची शक्यता तशी कमीच असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. आता राज्यातील निवडणुकांची घोषणा होण्याची त्यामुळेच शक्यता नसल्याचे राजकीय विश्लेषकांचा व्होरा आहे. अर्थात दुपारी 3 वाजता निवडणूक आयोग काय घोषणा करते, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.