विधानसभा निवडणूक निकालात सर्वात मोठा उलटफेर, महायुती 200 पार; महाविकास आघाडीचं न भूतो न भविष्यती पानिपत

| Updated on: Nov 23, 2024 | 11:09 AM

Mahayuti Big Victory 2024 : राज्यात जनतेच्या मनातील सरकार कोणाचे याचे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. पहिल्या फेरीपासून महायुतीने मोठी आघाडी घेतली. पहिल्या फेरीत राज्यातील अनेक मतदारसंघात भाजप-शिंदे सेना-अजितदादा गटाचा वारू उधळला आहे. महाविकास आघाडीचा सुपडा वाजल्याचे दिसून येत आहे.

विधानसभा निवडणूक निकालात सर्वात मोठा उलटफेर, महायुती 200 पार; महाविकास आघाडीचं न भूतो न भविष्यती पानिपत
भाजपा, महायुती
Follow us on

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडीला जोरदार झटका दिला आहे. तर महायुतीचा वारू पुन्हा उधळला आहे. लोकसभा निवडणुकीतील मळभ झटकून एक है तो सेफ है आणि कटेंगे तो बटेंगेचा थेट परिणाम महाराष्ट्रात दिसून आला आहे. महायुतीने राज्यात मॅजिक फिगर ओलांडला आहे. महायुतीने 200 पारचा नारा दिला आहे. तर महाविकास आघाडीचे न भूतो न भविष्यती असे पानिपत झाले आहे. महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते अजूनही पिछाडीवर असल्याने आता विरोधी पक्षाची माळ कोणत्या नेत्याच्या गळ्यात पडते हे कोडेही लवकरच सुटण्याची शक्यता आहे.

भाजपाची त्सुनामी

सर्व एक्झिट पोल राज्यात फेल ठरले आहेत. भाजपाची त्सुनामी आल्याचे दिसून येत आहे. राज्यात भाजपाने मोठी आघाडी घेतली आहे. सध्याच्या कलामध्ये भाजपाने 126 ठिकाणी आघाडी घेतल्याचे दिसते. यापूर्वी 2019 मध्ये हा आकडा 122 इतका होता. त्यामुळे राज्यात भाजपा-महायुतीची लाट आल्याचे दिसून आले आहे. भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यात अशी आली लाट

मुंबईतील 36 पैकी 30 जागांवर महायुतीने आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडी केवळ 10 जागांवर पुढे आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कल पाहता, याठिकाणि 58 पैकी 42 जागांवर महायुतीने मोठी कामगिरी बजावली आहे. याठिकाणी सुद्धा महाविकास आघाडीला 10 जागांवर आघाडी घेतल्याचे दिसत आहे. उत्तर महाराष्ट्रातील 47 जागांपैकी 36 जागांवर महायुतीने मोठा उलटफेर केला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे केवळ 6 जागांवर गणित जुळत असल्याचे दिसते. तर विदर्भातील 62 जागांपैकी महायुती 45 ठिकाणी आगेकूच केली आहे. तर महाविकास आघाडीने 15 जागांवर आघाडी घेतली आहे. तर मराठवाड्यातील 46 जागांपैकी 36 जागांवर महायुतीने मुसंडी मारली आहे. तर महाविकास आघाडीला केवळ 8 जागांवर गणित जुळवता आले आहे. तर मुख्यमंत्र्‍यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणेसह कोकणातील 39 जागांवर महायुतीने 32 जागांवर आघाडी उघडली आहे. तर या पट्ट्यात केवळ चार जागांवरच महाविकास आघाडीला जम बसवत असल्याचे दिसते. थोड्याच वेळात सर्व चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीत शिंदे सेना आणि अजित पवार गटाने पण जादु दाखवली आहे.