आता संपूर्ण देशाला मान्सूनची प्रतिक्षा लागली आहे. मान्सूनने केरळमध्ये धडक दिल्याने तो लागलीच महाराष्ट्रात सरींचा सांगावा घेऊन येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. उकाड्यापासून एकदाची सूटका होईल म्हणून मुंबईकर आनंदले होते. पण त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. मुंबईकरांची पावसाची प्रतिक्षा लांबणीवर पडली आहे. मुंबईत मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल होणार असल्याची ताजी अपडेट समोर येत आहे. तोपर्यंत नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
प्रतिक्षा पावसाची, वार्ता यलो अलर्टची
मुंबईकरांची पावसाची प्रतिक्षा लांबणीवर पडली आहे. मुंबईत मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात दाखल होणार आहे. आजचा दिवसही डोक्याला ताप वाढवणारा असेल. तापमान ३६ अंशापर्यंत राहील तर आर्द्रताही ६० टक्क्यांहून जास्त असेल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्याला, बूधवारपर्यंत उष्ण आणि दमट वातावरणाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
उष्णतेची लाट
ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्ण वातावरणाची शक्यता वर्तवली आहे. पावसाळा जवळ येत असल्याने मुंबई हवेतील आर्द्रता वाढली आहे. घामाचा धारा लागल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. पाणी जास्त प्या, टोपी घाला , उन्हाच्या कडाक्यात फार फिरु राहू नका असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
जळगावमध्ये उष्णतेमुळे जमावबंदी
उष्णतेचा धोका लक्षात घेता जळगाव जिल्ह्यात आजपासून 3 जूनपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जमाबंदीचे आदेश दिले आहेत. रस्ते डागडुजी, बांधकाम रोजगार हमी यासह वेगवेगळ्या प्रकल्पाची कामे असल्यास मजुरांना सोबत घेऊन कडक उन्हात काम न करण्याच्या वेगवेगळ्या शासकीय विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. उष्णतेच्या लाटा पाहता आरोग्य विभागाने पण नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात तापमानाने आतापर्यंतचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. काही जिल्ह्यात तापमान 45 अंशांच्या घरात पोहचले आहे.