मुंबईः सध्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. तर त्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांवर दावा सांगितल्यानंतर सीमावादाची आणखी एक ठिणगी पडली. त्यामुळे आज महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्षांची आज बैठक घेऊन राज्यातील महाराष्ट्रद्रोहींविरोधात विरोट मोर्चा काढण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.
हा अतिविराट मोर्चा मुंबईत 17 डिसेंबर रोजी निघणार असून जितामाता उद्यानापासून छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत हा विराट मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितली.
यावेळी काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हेही उपस्थित होते.
सातत्याने महाराष्ट्राचा जो अपमान आणि अवहेलना केली जाते आहे. त्याच बरोबर महाराष्ट्राचे अस्तित्वही नाकारण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात सध्या एका बाजूने महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न केला जातो आहे.
त्याविषयीही या विराट मोर्चामध्ये मत मांडली जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्याच्या सीमेला लागून असलेली गाव आणि त्यांच्या आजूबाजूच्या राज्यांकडून करण्यात येत असलेला दावा त्यालाही सडेतोड उत्तर देणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
सीमाभागातील गावांबरोबरच मुंबईवरही घाला घालण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप केंद्र आणि राज्य सरकारवर करण्यात आला आहे.
गुजरात निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवले असले तरी त्यामध्ये महाराष्ट्रातून पळवलेल्या उद्योगधंद्यांचे योगदान असल्याचा ठपका भाजपवर ठेवण्यात आला आहे.
राज्यातील रोजगार आणि औद्योगिक विकास ओरबडून घेतला असल्याची टीकाही गुजरातवर करण्यात आली आहे. त्यामुळे समविचारी पक्षानी एकत्र येत महाराष्ट्रप्रेमींनी आम्ही या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करतो असंही यावेळी सांगण्यात आले.