अटक झाली तरी चालेल, शिवरायांसाठी गोळ्या खायलाही तयार; शिवसेनेच्या रणरागिणी आक्रमक; हुतात्मा चौकात भगवं वादळ

| Updated on: Sep 01, 2024 | 11:39 AM

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले यांसह अनेक दिग्गज नेते या आंदोलनात सहभागी झाले आहे. आता हुतात्मा चौकात अनेक शिवसैनिक जमण्यास सुरुवात झाली आहे.

अटक झाली तरी चालेल, शिवरायांसाठी गोळ्या खायलाही तयार; शिवसेनेच्या रणरागिणी आक्रमक; हुतात्मा चौकात भगवं वादळ
Follow us on

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांत कोसळल्याने राज्यभरातील शिवप्रेमी दुखावले आहेत. या प्रकरणी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून आज आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. महाविकासाघाडीतर्फे आज जोडे मारा आंदोलनाला सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले यांसह अनेक दिग्गज नेते या आंदोलनात सहभागी झाले आहे. आता हुतात्मा चौकात अनेक शिवसैनिक जमण्यास सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक महिला शिवसैनिक आक्रमक झाल्या आहेत.

मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत महाविकासआघाडीचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनासाठी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी हे हुतात्मा चौकात दाखल झाले आहेत. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. तुम्ही पोलीस जरी आणलात तरीही आम्ही इथून अजिबात हटणार नाही. जोडे मारो आंदोलन होणार म्हणजे होणारच, अशी प्रतिक्रिया महिला शिवसैनिकांनी दिली आहे.

महिला शिवसैनिक आक्रमक

फक्त आंदोलनच नव्हे तर मराठी माणसाला दडपण्याचे काम या भाजपने केले आहे. भारत जलाओ पार्टी आणि पार्टी तोडो घर तोड या पार्टीने केले आहे. देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचे तुकडे केले आहेत. गेल्या १० वर्षात काय राज्यात चांगलं आहे. या राज्यात मराठी माणूस सुखी नाही. मुलगी सुखी नाही. बदलापुरात काय झालं? याचेही राजकारण गिरीश महाजन आणि देवेद्र फडणवीसांनी केले. याचा करारा जबाब म्हणून आम्ही अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, कोणाला कंत्राट देता, मुख्यमंत्र्‍यांच्या मुलाच्या मित्रांना…घरची खेती आहे का? तुमच्या घरातला सातबारा आहे का? असा प्रश्न महिला शिवसैनिकांनी उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा

राणेंची मुलं जे काही वागतात कुणीही इथे यायचं नाही, आम्ही घरात घुसून मारु, असं ते सांगतात ही दादागिरी खपवून घेतली नाही. महाराष्ट्राचा सातबारा शिंदे फडणवीस पवारांच्या नावावर नाही. महाराष्ट्राचा सातबारा शाहू फुले आंबडेकर छत्रपती शिवरायांच्या नावावर आहे. ती मराठी माणसं इथे राहतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आम्ही मनं दुखावली आहेत. याचा करारा जबाब तुम्हाला मिळणार. तुम्ही पोलीस जरी आणलात तरीही आम्ही मराठी माणसं इथून अजिबात हटणार नाही. जोडे मारो आंदोलन होणार म्हणजे होणारच. अटक झाली तरी चालेल आम्ही महाराजांसाठी गोळ्या पण खायलाही तयार आहोत. हर हर महादेव, असेही महिला शिवसैनिकांनी ठणकावून सांगितले.

हुतात्मा चौकात भगवं वादळ

दरम्यान सध्या राज्यभरात महाविकासआघाडीच्या जोडे मारा आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यावेळी हुतात्मा चौकात भगवं वादळ आल्याचे पाहायला मिळत आहे. हुतात्मा चौकातून लाखो कार्यकर्ते हे गेट वे ऑफ इंडिया पायी चालत या आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी सरकारचा निषेध केला जात आहे.