MahaVikasAghadi Protest in Mumbai : सिंधुदुर्गातील मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. यामुळे शिवप्रेमी संताप व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणावरुन विरोधकही आक्रमक झाले आहे. महाविकासआघाडीतर्फे आज सरकारला जोडे मारा आंदोलन केले जाणार आहे. आज रविवारी 1 सप्टेंबर रोजी महाविकासआघाडी सरकारतर्फे हे ‘जोडे मारा’ आंदोलन केले जाईल. गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाजवळ हे आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महाविकासाघाडीतर्फे आज जोडे मारा आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले यांसह महाविकासआघाडीतील अनेक दिग्गज नेते सहभागी होणार आहे. राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांत कोसळल्याने राज्यभरातील शिवप्रेमी दुखावले आहेत. या प्रकरणी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी या आंदोलनाची हाक दिली आहे.
महाविकासआघाडीचा मोर्चा हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत काढण्यात येणार आहे. यानंतर गेटवे ऑफ इंडियाजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला पोलिसांची अद्याप परवानगी दिलेली नाही. पण तरीही महाविकासआघाडीतील नेते आंदोलनावर ठाम आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून हुतात्मा चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा संपूर्ण मुंबईत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
महाविकासआघाडीच्या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळत आहे. या परिसरात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बॅरिकेटींग करण्यात आले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात फौजफाटाही तयार ठेवण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे. तसेच हुतात्मा चौकापासून गेट ऑफ इंडियापर्यंतचा परिसर नो पार्किंग झोन करण्यात आला आहे.
त्यासोबत गेट वे ऑफ इंडिया हा परिसर सकाळी 10 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुला असणार आहे. त्यानंतर पोलिसांकडून पर्यटकांसाठी गेट वे ऑफ इंडिया बंद केले जाणार आहे. महाविकासआघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या आंदोलनाला पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाही. तरी प्रमुख नेते आंदोलनात सहभागी होणार असल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने याबद्दल ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘राजे, आम्ही येत आहोत, तुमच्या चरणी नतमस्तक व्हायला, महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवायला,’ असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनाला निषेध करण्यासाठी महायुतीकडूनही राज्यभरात आंदोलन केले जाणार आहे.