राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जागर केला तर आता ईव्हीएमवरून महाविकास आघाडीचा गोंधळ सुरू आहे. त्यातच सत्ता स्थापनेला महायुतीने निकालानंतर जवळपास १० दिवसांचा अवधी खर्ची पाडला. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची, एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पण त्यानंतर एक आठवडा उलटला तरी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा रेंगाळली होती. गृहमंत्री पदापासून तर इतर मलाईदार खात्यासाठी मोर्चबांधणी सुरू झाली होती. महायुतीमधील तीनही घटक पक्षांनी महत्त्वाच्या पदावर दावा सांगीतला होता. १२ डिसेंबर रोजी अजितदादा दिल्लीत तळ ठोकून होते. तर मुख्यमंत्री पण दिल्ली दरबारी होते. आज दिल्लीतून मंत्र्यांच्या नावाची यादी अंतिम होऊन येणार असल्याची माहिती समोर आली होती. तर मुख्यमंत्री स्वत: भावी मंत्र्यांना फोन करून त्यांच्या निवडीची बातमी देणार होते. त्यानुसार शिवसेनेच्या या शिलेदारांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अगदी थोड्याच वेळात कॉल
नागपूरमध्ये उद्या १५ डिसेंबर रोजी संध्याकाळी ४ वाजता नव्या सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपूर अनेक जणांसाठी लकी ठरणार आहे. नागपूरची संत्रा बर्फीने त्यांचे तोंड गोड होणार आहे. १६ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाचे पडघम वाजतील. त्यापूर्वीच तीनही पक्षांच्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. त्यात आता कुणाच्या नावाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज रात्री ११ वाजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवड झालेल्या सर्वच मंत्र्यांना कॉल करणार असल्याचे समजते. तर शिवसेनेतूनही त्यांच्या शिलेदारांना मंत्री पदाबाबत संपर्क साधण्यात येणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून अनेक मंत्र्यांनी देव पाण्यात ठेवले आहे. अनेकांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे तळ ठोकला होता. गेल्या मंत्रिमंडळातील काही जणांना डच्चू मिळणार असल्याच्या वृत्ताने काहींना धडकी भरली आहे. आता या यादीत आपले नाव येते की नाही याची धाकधूक सर्वांनाच आहे. आज रात्र खऱ्या अर्थाने काहींसाठी वैऱ्याची आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
काहींना पक्ष जबाबदारी
शिवसेनेतून आज रात्री ११ वाजेनंतर आमदारांना फोन कॉल जायला सुरुवात होणार आहे. यामध्ये ९ जणांची नावे मंत्रिपदासाठी फायनल झाल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे. तर दीपक केसरकर आणि संजय राठोड यांच्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. ज्या माजी मंत्र्यांना यंदा कॅबिनेटमध्ये स्थान नाही त्यांना पक्षाची जबाबदारी आणि महामंडळावर त्यांची वर्णी लावली जाणार आहे.
शिवसेनेच्या या शिलेदारांची मंत्रिपदासाठी वर्णी
उदय सामंत
दादा भुसे
शंभूराज देसाई
संजय शिरसाट
भरत गोगावले
अर्जुन खोतकर
प्रताप सरनाईक
प्रकाश आबिटकर
विजय शिवतारे