महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अफाट घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे महायुतीच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. अमित शाह यांचा ताफा मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाला आहे. अमित शाह यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सह्याद्री अतिथीगृह येथे दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. अमित शाह यांची आज महायुतीच्या नेत्यांसोबतही बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह यांच्या उपस्थितीत आज लोकसभा निवडणुकीत महायुतीचा झालेला पराभव या विषयावर विश्लेषण होण्याची शक्यता आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती काय नवीन गणितं आखणार आहे? ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
अमित शाह यांचा आजचा मुक्काम हा सह्याद्री अतिथीगृहावर असणार आहे. अमित शाह यांना भेटण्यासाठी भाजपचे अनेक दिग्गज नेते सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री रविंद्र चव्हाण असे अनेक दिग्गज नेते अमित शाह यांच्या भेटीला आले आहेत.
महायुतीच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजना सारख्या अनेक लोकपयोगी योजनांची घोषणा करण्यात आली आहे. या योजनांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत प्रचारामध्ये कोणकोणते मुद्दे असावेत, विधानसभेसाठी जागावाटप कसं असावं, याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.